पंचकुला: ग्राहकाकडून अधिकचे पैसे घेणं स्विगीला महागात पडलं आहे. एमआरपीवर जीएसटी आकारल्यानं स्विगीला २० हजारांचा दंड भरावा लागला. जीएसटी एमआरपीवर लागत नाही. स्विगी अशा प्रकारे ग्राहकांवर अन्याय करू शकत नाही, असं ग्राहक संरक्षण न्यायालयानं सुनावणीवेळी म्हटलं. न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, अशा शब्दांत न्यायालयानं स्विगीची खरडपट्टी काढली.
हरयाणाच्या पंचकुला येथील सेक्टर २ मध्ये राहणाऱ्या अभिषेक गर्ग यांनी ५ ऑगस्ट २०१८ रोजी स्विगीवरून एक ऑर्डर केली. सेक्टर ९ मध्ये असलेल्या पिनोज पिझ्झामधून त्यांनी कोकच्या तीन बाटल्या आणि चीज स्टिक्स मागवल्या. त्याचं बिल १९७ रुपये झालं. यावर स्विगीनं साडे चार रुपयांचा जीएसटी लावला. यावरून गर्ग यांनी स्विगीला मेल केला. जीएसटी लावणं चुकीचं असल्याचं त्यांनी मेलमध्ये नमूद केलं.
अभिषेक गर्ग यांनी पंचकुला येथील ग्राहक संरक्षण मंचाकडे धाव घेतली. त्यांनी ३१ मे २०१९ रोजी खटला दाखल केला. दोन वर्षे सुनावणी झाली. न्यायालयानं स्विगीला दोषी ठरवत ४.५० रुपये परत करण्यास सांगितले. याशिवाय स्विगीला २० हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले.
सीए असलेल्या अभिषेक गर्ग यांना ४.५० रुपयांच्या जीएसटीसह १० हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानं दिले. न्यायालयाचा वेळ वाया घालवल्यानं १० हजारांचा अतिरिक्त दंड भरण्याचे आदेशही न्यायालयानं दिले. कोणत्याही ग्राहकाकडून अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं जीएसटी घेऊ नका, अशी तंबी न्यायालयानं स्विगीला दिली.