हैदराबाद - एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असद्दुद्दीन औवेसी यांनी काँग्रेस आणि भाजपला आव्हान दिलं आहे. शिवसेनेच्या सामना मुखपत्रातील अग्रलेखाला औवेसींनी उत्तर दिले. हैदराबादमधील चारमिनार हे आमच्या पूर्वजांची निशाणी आहे. आमच्या संस्कृतीची ओळख असून वास्तुकलेचा उत्तम नमूना आहे, असे म्हणत भाजपाध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हैदराबादमधून निवडणूक लढवून दाखवावी असे औवेसींनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अमित शहा यांनी 10 वर्षांपूर्वी हैदराबादचा दौरा केला होता. त्यावेळी हैदराबादला मजलिसमुक्त करू असे ते म्हणाले होते. त्यामुळेच, मी अमित शहा आणि राहुल गांधींना हैदराबादमधून निवडणूक लढविण्याचे आव्हान देत असल्याचे औवेसी यांनी म्हटले. सामनातून शिवसेनेने केलेल्या टीकेला उत्तर देताना औवेसी यांनी भाजपा आणि काँग्रेसला लक्ष्य केलं. अयोध्येत राम मंदिर बांधूनचा दाखवा असे औवेसींनी म्हटले होते. त्यानंतर, शिवसेनेच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी औवेसींचा समाचार घेतला. ओवेसीचे ‘बापजादे’ बाबर वंशाचे असतील तर त्यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी पद्धतीचे फूत्कार सोडावेत. भारतात हिंदू-मुस्लिम वाद करू नये. मंदिराचे काम अयोध्येत सुरू करायचे आहे, हैदराबादेत नाही. भाजपाचे बहुमताचे सरकार आज आहे, म्हणून कायद्याचा आग्रह आम्ही धरला. रामाचा वनवास 2019 पूर्वी संपवा. हे मागणं ‘लई’ नाही, असे शिवसेनच्या अग्रलेखात म्हटले होते.