'चॅटजीपीटी'ची वाढती लोकप्रियता आता भारतातील शिक्षकांनाही डोकेदुखी ठरत आहे. त्याला एखाद्या चित्रपटाचे कथानक लिहायला सांगा की व्हिडीओ बनवण्यासाठी नवीन आयडिया विचारा... सगळं एका क्लिकवर मिळतं. विद्यार्थ्यांच्या तर जवळपास सर्वच प्रश्नांची तो अचूक उत्तरे देतो. अगदी निबंध, अवघड गणितं, असाइनमेंट कसलीही. ओपनएआय कंपनीचे हे सॉफ्टवेअर तूर्तास मोफत आहे, पण यामुळेच खरी समस्या निर्माण झाली आहे. या चॅटबॉटने अमेरिकेतील काही प्रतिष्ठित परीक्षाही उत्तीर्ण केल्याच्या वृत्तानंतर फ्रान्समधील सायन्सेस पो या सर्वोच्च विद्यापीठांपैकी एकाने हे सॉफ्टवेअर बॅन केले. न्यू यॉर्कच्या शिक्षण विभागानेही बंदी घातली. त्यापाठोपाठ भारतातही बंदी येण्यास सुरुवात झाली आहे. बंगळुरुतील आर. व्ही. युनिव्हर्सिटीने कॅम्पसमध्ये याच्या वापरावर बंदी घातली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा, प्रयोगशाळेच्या चाचण्या आणि असाइनमेंटमध्ये त्याचा वापर करू नये यासाठी ही बंदी आहे. प्रोजेक्ट किंवा काम ओरिजनल नसल्याचे आढळल्यास पुन्हा करायला दिले जाईल, असेही युनिव्हर्सिटीने स्पष्ट केले आहे. यासोबतच गिटहब को-पायलट आणि ब्लॅक बॉक्स अशा अन्य एआय टूल्सवरही बंदी घातली आहे.
ChatGPT: भारतातल्या शिक्षकांसाठीही 'चॅटजीपीटी' डोकेदुखी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 6:19 AM