नवी दिल्ली - छत्तीसगडमध्ये गौरा-गौरी पूजा करण्याची एक अनोखी परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. पण याच वेळी मुख्यमंत्र्यांना चाबकाचे फटके मारले जात असल्याची प्रथा देखील पाहायला मिळत आहे. गोवर्धन पुजेच्या निमित्ताने मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chattisgarh CM Bhupesh Baghel) यांच्या हातावर एक दोन नव्हे तर तब्बल 8 फटके मारण्यात आले आहेत. लोकांच्या समस्या यामुळे दूर होतात असा येथील लोकांचा समज असल्याने मुख्यमंत्र्यांना चाबकाचे फटके हे खावे लागतात. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
गोवर्धन पुजेच्या परंपरेनुसार मुख्यमंत्री भूपेश बघेल दरवर्षी राज्याच्या भल्यासाठी, शुभकार्यासाठी आणि अडथळ्यांच्या नाशासाठी चाबकाचा वार सहन करतात. मुख्यमंत्र्यांसोबत असलेली ही परंपरा शुक्रवारी सकाळी जंजगिरी गावात पार पाडली. एका ग्रामस्थाने चाबकाने त्यांना फटके मारले. ही प्राचीन परंपरा असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. अशा प्रकारे चाबकाचा प्रहार अडथळ्यांचा नाश करणारा आहे, तसेच आनंद आणि समृद्धी आणणारा आहे असं मानलं जातं. यावेळी लोकांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गावात गर्दी केली होती.
ग्रामीण भागात गोवर्धन पूजा लोकप्रिय
गोवर्धन पूजा ही गोवंशाच्या समृद्धीची परंपरेची पूजा आहे, गोवंश जितका समृद्ध तितकी आपली प्रगती होईल. त्यामुळेच ग्रामीण भागात गोवर्धन पूजा लोकप्रिय आहे. लोक वर्षभर त्याची वाट पाहत असतात, एक प्रकारे ही पूजा गायीप्रती आपल्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी दुर्ग जिल्ह्यातील जंजगिरी गावात आयोजित करण्यात आलेल्या गौरा-गौरी तिहार पुजेमध्ये सहभाग घेतला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.