रायपूर - खरंतर जीवनात यशस्वी होण्यासाठी परीक्षेतील मार्काची नाही तर माणसांतील टॅलेंटची गरज असते. जर तुमच्यात टॅलेंट असेल तर आयुष्यातील परीक्षेत तुम्हाला यश नक्कीच मिळतं. दरवर्षी हजारो विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षा देत असतात. दहावी, बारावी परीक्षा तर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. मात्र या टप्प्यात यश मिळालं नाही तर विद्यार्थी निराश होता.
आई-वडिलांची अपेक्षा आणि सामाजिक दडपणाखाली विद्यार्थी शिक्षण घेत असतो अशी आपली शिक्षणपद्धती आहे. त्यामुळेच जर परीक्षेत कमी गुण मिळाले अथवा नापास झाले तर विद्यार्थी चुकीचं पाऊल उचलून आपलं आयुष्य संपविण्याचा विचार मनात आणतो. कितीतरी विद्यार्थी गेल्या काही वर्षात या शिक्षण पद्धतीमुळे नैराश्याच्या छायेत ओढली गेली आहेत. बोर्डाच्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यासाठी निकालात मिळालेले गुण हे फक्त विद्यार्थ्यासाठी नाही तर त्यांच्या पालकांसाठीही प्रतिष्ठेची बाब ठरते. त्यामुळे विद्यार्थीदेखील या शैक्षणिक दडपणाखाली दबून जातो.
मागील आठवड्यात छत्तीसगड बोर्डाच्या परीक्षेचे निकाल लागले. या निकालानंतर अपेक्षित मार्क न मिळाल्याने एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही बातमी वाचून छत्तीसगडमधील एक आयएएस अधिकारी व्यथित झाले. विद्यार्थ्यांच्या मनातील ही खदखद लक्षात घेता आयएएस अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मिडीयावर एक सकारात्मक संदेश लिहिला आहे.
2009 च्या आयएएस बॅचमधील अधिकारी आणि कवर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अवनीश शरण यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमधून अवनीश शरण यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना परीक्षेतील गुण गंभीरतेने घेऊ नका असं आवाहन केलं आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, परीक्षेतील गुण फक्त नंबरांचा खेळ असतो. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील टॅलेंट सिद्ध करण्यासाठी जीवनात अनेक संधी प्राप्त होते त्यामुळे जीवन जगत राहा.
अवनीश शरण यांनी या फेसबुक पोस्टसोबत त्यांच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डात मिळालेले मार्क्स जोडलेले आहेत. त्यात या आयएएस अधिकाऱ्याला दहावीमध्ये 44.5 टक्के तर बारावीत 65 टक्के गुण मिळाल्याचं सांगितलं आहे. तसेच पदवीधर परीक्षेत 60.7 टक्के मार्क्स मिळाले आहेत.
त्यामुळे जीवनात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपलं ध्येर्य गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी कायम प्रयत्नशील राहिलं पाहिजे. संधी प्राप्त होतील. शालेय जीवनातील निकालांवर तुमचं भविष्य ठरवू नका. ते लवकर संपवा कारण परीक्षेतील निकाल म्हणजे जगाचा अंत नाही अशा शब्दात अवनीश शरण यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केलं आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनो निराश होऊ नका, आयुष्यातील परीक्षेत यश मिळविण्यासाठी तुमच्यातील टॅलेंट शोधा. आत्महत्येचा विचार करु नका. कारण परीक्षेतील मार्क्सपेक्षा तुम्हाला आयुष्यात मिळणाऱ्या संधी जास्त आहेत त्याचं सोनं करा.