नवी दिल्ली : हरियाणात ३,२०६ कनिष्ठ शिक्षकांच्या भरतीत झालेल्या घोटाळ््याबद्दल त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचा मुलगा अजय सिंग यांची १० वर्षांसाठी तुरुंगात रवानगी झाली आहे. यामुळे हरियाणाच्या राजकारणातील चौटाला पर्व संपल्यात जमा आहे.सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निकाल पूर्णपणे तर्कसंगत असल्याने आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे नमूद करत न्या.फकीर मोहम्मद इब्राहीम कलिफुल्ला आणि न्या. शिवकीर्ती सिंग यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने चौताला पिता-पुत्रांसह इतरांनी केलेली अपिले फेटाळली.सिद्धदोष गुन्हेगारांपैकी कोणाला प्रकृती व वार्धक्याच्या कारणावरून पॅरॉल हवा असेल तर त्यासाठी ते उच्च न्यायालयात अर्ज करू शकतात, असे खंडपीठाने स्पष्ट केले.हरियाणातील हा खटला दिल्लीत चालविला गेला होता. सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने एकूण ५५ आरोपींना दोषी ठरवून त्यांना तुरुंगवास ठोठावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपिले आली होती. ती फेटाळली गेल्याने चौटाला पिता-पुत्रांखेरीज हा घोटाळा उघड करणारे हरियाणाचे तत्कालिन प्राथमिक शिक्षण संचालक संजीव कुमार, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी विद्याधर व तत्कालिन आमदार व मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार शेर सिंग बदशामी यांना १० वर्षे तुरुंगात राहावे लागणार आहे.गुन्हेगारी कट, फसवणूक, बनावट दस्तावेज तयार करणे व बनावट दस्तावेज असली म्हणून वापरणे या गुन्ह्यांसाठी या शिक्षा झाल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)(लोकमत न्यूज नेटवर्क)
चौटाला पिता-पुत्राला १० वर्षांची कैद
By admin | Published: August 03, 2015 11:13 PM