नवी दिल्ली : महागाईची झळ सोसत असलेल्या सर्वसामान्यांना स्वस्ताईची चव चाखायला मिळण्याची शक्यता असून, दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. १० नोव्हेंबर रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया जीएसटी परिषदेच्या बैठकीत यावर निर्णय होऊ शकतो. हाताने बनविलेले फर्निचर, प्लास्टिक उत्पादने आणि शाम्पू यासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कराचा दर कमी होऊ शकतो.सरकारी अधिकाºयांनी सांगितले की, दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील २८ टक्क्यांचा दर कमी करण्याचा विचार सुरू आहे. लघु व्यवसायात जेथे जीएसटी लागू झाल्यानंतर कराची सीमा वाढली आहे तेथे करांचे दर तर्कसंगत करण्याबाबतही विचार सुरू आहे. पूर्वी अशा क्षेत्रात उत्पादनांना उत्पादन शुल्कात सूट होती किंवा कमी दराने व्हॅट लागत होता.२८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर?एका अधिकाºयाने सांगितले की, २८ टक्के कर असणाºया वस्तूंवरील दर तर्कसंगत करण्यात येणार आहे. हे दर कमी करून १८ टक्के केले जाऊ शकतात. याशिवाय फर्निचर, इलेक्ट्रिक स्विच, प्लास्टिक पाइप यांच्या कराच्या दराचीही समीक्षा केली जाणार आहे. सर्व प्रकारच्या फर्निचरवर २८ टक्के कर आहे. लाकडाचे काम साधारणपणे असंघटित क्षेत्रात होते. याचा उपयोग मध्यमवर्गात होतो. प्लास्टिक उत्पादनांवरही १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. पण, शॉवर बाथ, वॉश बेसिन, सीट, कव्हर आदींवरील जीएसटीचा दर २८ टक्क्यांपर्यंत आहे. याबाबतही पुनर्विचार करण्यात येणार आहे.याशिवाय वजन करण्याच्या मशीन आणि कॉम्प्रेसर यावरील जीएसटी 28 टक्क्यांहून १८% करण्याचा प्रयत्न आहे.जीएसटी परिषदेत सर्व राज्यांचे प्रतिनिधी सहभागी आहेत. परिषदेने यापूर्वीच 100 पेक्षा अधिक वस्तूंवरील दर बदलले आहेत.
स्वस्ताई : फर्निचर, प्लास्टिक उत्पादने, शाम्पूवरील जीएसटी कमी करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 5:54 AM