नवी दिल्ली : एका भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनीने सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रीडम २५१’ बुधवारी बाजारात आणला. या ‘३-जी’ स्मार्टफोनची किंमत केवळ २५१ रुपये आहे. वेगाने वाढणाऱ्या भारतीय मोबाईल हॅण्डसेट बाजारात हा स्मार्टफोन धुमाकूळ घालू शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फ्रीडम २५१ चा ४ इंचाचा क्यूएचडी डिसप्ले असून ९६० इनटू ५४० एवढे पिक्सल रिजोल्युशन आहे. याशिवाय क्वालकाम १.३ गीगाहर्टज् क्वाड-कोर प्रोसेसर आणि एक जीबीची रॅम असेल. अॅण्ड्रॉईड ५.१ लॉलीपॉप आॅपरेटिंग सिस्टीमवर आधारित या हॅण्डसेटमध्ये ८ जीबीची इंटरनल स्टोरेज सुविधा असून मायक्रो एसडी कार्ड वापरून ती ३२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकेल. यात ३.२ मेगापिक्सलचा रियर आणि ०.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. त्याचबरोबर १,४५० एमएएचची बॅटरी त्याला इंधन पुरवेल. या फोनमध्ये वूमेन सेफ्टी, स्वच्छ भारत, फिशरमॅन, फार्मर, मेडिकल, व्हॉटस् अॅप, फेसबुक आणि यू ट्यूबसह अनेक अॅप्स इनबिल्ट असतील. फ्रीडम- २५१ साठी उद्यापासून (ता. १८) बुकिंग सुरू होईल. यापूर्वी कंपनीने सर्वात स्वस्त ४-जी स्मार्टफोन २,९९९ रुपयांत बाजारात उतरविला होता. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते राजधानी नवी दिल्लीत सायंकाळी फ्रीडम २५१ चे अनावरण झाले. हा फोन पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. पैशांअभावी स्मार्टफोन वापरू न शकणाऱ्यांचे हे स्वप्न फ्रीडम २५१ साकारेल हे निश्चित.
स्वस्त ‘स्मार्टफोन’ बाजारात
By admin | Published: February 18, 2016 6:45 AM