मुंबई: देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या दरानं 80 रुपयांचा टप्पा ओलांडलाय. मुंबईत तर आज पेट्रोल प्रति लिटर 86.24 रुपयांवर जाऊन पोहोचलंय. जयपूर, कोलकाता, श्रीनगर, भोपाळ या शहरांमध्येही पेट्रोलचे दर वाढल्यानं सामान्य जनता त्रस्त झालीय. मात्र अंदमान आणि निकोबार बेटांवर पेट्रोल 67.55 प्रति लिटर रुपयांना मिळतंय. तर डिझेलसाठी 64.80 रुपये मोजावे लागताहेत. संपूर्ण देशात इतकं स्वस्त पेट्रोल आणि डिझेल इतर कुठेही मिळत नाहीय.देशातील राज्यं पेट्रोल, डिझेलवर मोठ्या प्रमाणात व्हॅट लावतात. त्यामुळे इंधन दरात मोठी वाढ होते. मात्र अंदमान निरोबारमध्ये पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट फक्त 6 टक्के इतका आहे. त्यामुळेच या ठिकाणी पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळतं. स्वस्त इंधन दराचा विचार केल्यास अंदमान निकोबारनंतर गोव्याचा क्रमांक लागतो. गोव्यात पेट्रोल, डिझेलवर 16.62 टक्के व्हॅट आहे. त्यामुळे आज गोव्यात पेट्रोलचा दर 72.31 रुपये इतका आहे. तर डिझेलसाठी गोव्यात 70.58 रुपये मोजावे लागत आहेत. देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मुंबईत मिळतंय. आज मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 86.24 रुपये इतका आहे. राज्य सरकारनं पेट्रोलवर तब्बल 39.78 टक्के व्हॅट लावला आहे. सध्या आसाम, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, केरळ, जम्मू कश्मीर, आंध्र प्रदेश, पंजाब, बिहार आणि मध्य प्रदेशात पेट्रोलचा दर 80 रुपयांहून अधिक आहे.
'या' ठिकाणी मिळतंय देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 1:43 PM