ऑनलाइन लोकमत -
बंगळुरु, दि. 18 - रिंगिंग बेल्सनंतर पुन्हा एकदा बाजारात स्वस्त स्मार्टफोन आणण्यात आला आहे. बंगळुरुमधील 'नमोटेल' ही कंपनी हा स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणत असून याची किंमत फक्त 99 रुपये असणार आहे. या स्मार्टफोनला 'नमोटेल अच्छे दिन' असं नाव देण्यात आलं आहे.
17 मे पासून ते 25 मे पर्यंत या फोनची बुकींग करता येणार आहे. कंपनीची वेबसाईट namotel.com वरुन हा फोन बुक करता येणार असल्याची माहिती कंपनीचे प्रमोटर माधव रेड्डी यांनी दिली आहे. ही वेबसाईट तपासून पाहिली असता ओपन होताना दिसत नाही आहे.
हा स्मार्टफोन घेण्यासाठी फक्त 99 रुपये असून भागणार नाही आहे. ज्यांना हा स्मार्टफोन विकत घ्यायचा आहे त्यांना bemybanker.com वेबसाईटवर नाव नोंदवून युझर आयडी आणि पासवर्ड घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच namotel.com वेबसाईटवरुन फोन बुक करता येणार आहे. महत्वाचं म्हणजे bemybanker.com वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी 199 रुपयांची लाईफटाईम मेम्बरशिप फी भरावी लागणार आहे.
नमोटेलने केलेल्या दाव्याप्रमाणे 2999 वरुन ही किंमत 99 वर आणण्यात आली आहे. कॅश ऑन डिलिव्हरीवर हा फोन उपलब्ध असणार आहे. हा फोन मेक इन इंडिया अभियानासाठी आमचा पाठिंबा दर्शवण्यासाठी बनवला असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा फोन मर्यादित असून फक्त भारतात उपलब्ध आहे. महत्वाचं म्हणजे हा फोन विकत घेणा-यांसाठी आधार कार्ड असणं बंधनकारक असणार आहे.
नमोटेल अच्छे दिन स्मार्टफोनची वैशिष्ट्ये -
- 4 इंच डिस्प्ले
- 480x800 पिक्सल्स डब्ल्यूव्हीजीए रिजोल्यूशन
- अॅड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ओएस
- 1 जीबी रॅम
- 4 जीबी इंटरनल मेमरी (32 जीबी एक्स्पान्डेबल)
- 2 मेगापिक्सल कॅमेरा
- 3जी आणि डबल सीम