बंगळुरू : ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल, तसेच कंपनीचे तीन कर्मचारी यांच्या विरुद्ध ९.९६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यावसायिकाने त्यांच्या विरुद्ध १२,५०० लॅपटॉपचे पैसे बुडविल्याची तक्रार केली आहे.इंदिरानगरस्थित सी-स्टोअर कंपनीचे मालक नवीन कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिन बन्सल, बिन्नी बन्सल, विक्री संचालक हरी, लेखा व्यवस्थापक सुमित आनंद आणि शरौक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवीन कुमार यांनी २१ नोव्हेंबर रोजी ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुससार, नवीन कुमार यांनी जून २0१५ ते जून २०१६ या काळात फ्लिपकार्टला १४ हजार लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पुरविल्या होत्या. फ्लिपकार्टने १,४८२ वस्तू परत केल्या. उरलेल्या वस्तू स्वत:कडे ठेवून घेतल्या, मात्र त्याचे पैसे दिले नाही. पैशाचा तगादा लावण्यात आला, तेव्हा ३,९०१ वस्तू परत केल्याचा खोटा दावा कंपनीने केला, तसेच पैसे देण्यास नकार दिला. कंपनीने आपली ९,९६,२१,४१९ रुपयांना फसवणूक केली आहे, असे नवीन कुमार यांनी म्हटले आहे. इंदिरानगर पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सुरू आहे. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांची नावे एफआयआरमध्ये आहेत. (वृत्तसंस्था)
‘फ्लिपकार्ट’च्या संस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 5:38 AM