चित्ता प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच! सरकारकडून तयारीला सुरुवात; दोन नव्या ठिकाणांची सज्जता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 01:21 PM2023-09-16T13:21:53+5:302023-09-16T13:27:01+5:30

Cheetah in India: दक्षिण आफ्रिकेतून आणखी काही चित्ते भारतात आणले जाणार आहेत.

cheetah to india second phase will starts soon and two more places to include for cheetah from south africa | चित्ता प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच! सरकारकडून तयारीला सुरुवात; दोन नव्या ठिकाणांची सज्जता

चित्ता प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच! सरकारकडून तयारीला सुरुवात; दोन नव्या ठिकाणांची सज्जता

googlenewsNext

Cheetah in India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणजे चित्ता प्रकल्प. या प्रकल्पाला एक वर्ष पूर्ण होत असून, आता याच प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या काही चित्त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक आव्हाने समोर उभी राहिली आहेत. यातच दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारकडून तयारीला सुरुवात करण्यात आली असून, दोन नवीन ठिकाणांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडून भारताच्या प्रोजेक्ट चित्ताचे उद्घाटन केले होते. या प्रोजेक्टचा पहिला वर्धापन दिन रविवारी साजरा केला जाणार आहे. प्रोजेक्टच्या दुसऱ्या वर्षी चित्त्यांच्या प्रजननावर भर दिला जाणार आहे. तसेच चित्त्यांसाठी बनवलेल्या रेडिओ कॉलरमुळे कोणताही संसर्ग झालेला नाही, अशी माहिती पर्यावरण मंत्रालयातील वन विभागाचे अतिरिक्त महासंचालक एसपी यादव यांनी दिली. 

डिसेंबरपर्यंत आणखी चित्ते भारतात येणार

दक्षिण आफ्रिकेतून आणखी काही चित्ते भारतात आणले जाणार आहेत. मध्य प्रदेशातील गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात त्यांना ठेवण्यात येईल.या वर्षाच्या अखेरीस हे चित्ते भारतात येऊ शकतील. कुनोमध्ये सुमारे २० चित्त्यांची क्षमता आहे. सध्या तेथे १५ चित्ते आहेत. जेव्हा आणखी चित्ते देशात आणले जातील, तेव्हा त्यांच्या अधिवासाची सोय अन्य ठिकाणी करण्यात येईल. मध्य प्रदेशात अशी दोन ठिकाणे तयार करत आहोत, एक गांधी सागर अभयारण्य आणि दुसरे नौरादेही, असेही यादव यांनी सांगितले. 

दरम्यान, गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात साइट तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. हे काम नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या अखेरीस पूर्ण होईल. सर्व प्रकारे आणि दृष्टिकोनातून याचे मूल्यांकन केले जाणार आहे. तयारी पूर्ण झाल्याचा अहवाल मिळाल्यावर त्या ठिकाणी जाऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. देशासमोर चित्त्यांच्या संवर्धनाबाबत काही आव्हाने निश्चित असल्याचे यादव यांनी मान्य केले. तसेच त्यातून तोडगा काढण्याचे हरसंभव प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे. 

 

Web Title: cheetah to india second phase will starts soon and two more places to include for cheetah from south africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.