चेन्नई : भीषण पुराचा तडाखा बसलेल्या चेन्नई व उपनगरांमध्ये जलस्तरात घट झाली असून आता प्रभावित लोकांच्या पुनर्वसनासोबतच विविध भागांत साचलेला कचरा व गाळ स्वच्छ करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. दरम्यान, पाऊस थांबल्याने चेन्नई विमातळावरील विमान वाहतूकही पूर्ववत झाली आहे.सोमवारी पाऊस थांबून पुराचे पाणी ओसल्यामुळे चेन्नईकरांना मोठा दिलासा मिळाला. आता पूरप्रभावित भागांतील मलबा हटविण्याच्या कामाला वेग आला आहे. पुराच्या पाण्यात डुंबल्यामुळे अनेक भागांत दुर्गंधी पसरली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.मुसळधार पावसामुळे अनेक दिवसांपासून ठप्प पडलेली रेल्वे व विमानसेवा सोमवारी पूर्ववत सुुरू झाली. शनिवारपासून रेल्वेसेवा आंशिकरूपात सुरू झाली होती; मात्र सोमवारपासून सर्व गाड्यांची वाहतूक सुरूझाली. चेन्नई विमानतळावरही पूर्णपणे काम सुरू झाले.पुड्डचेरीला हवी २०० कोटींची मदतकराईकल: गत तीन आठवड्यांपासून मुसळधार पाऊस व पुराचा प्रकोप झेलणाऱ्या पुड्डचेरी या केंद्रशासित प्रदेशातही अतोनात हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसनासाठी पुड्डुचेरीला केंद्राकडून २०० कोटी रुपयांची मदत हवी आहे.पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पुरामुळे घरे, रस्ते, पशुधन व पिकांचे गंभीर नुकसान झाले आहे. यासाठी केंद्राकडे २०० कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती केली जाईल, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)पुराच्या पाण्यात अडकलेल्या रामपूरम भागातून हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलेल्या एका गर्भवती महिलेने सोमवारी येथील एका रुग्णालयात जुळ्या मुलींना जन्म दिला.दीप्ती वेलचमी असे या महिलेचे नाव आहे. २ डिसेंबरला दीप्ती यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.
चेन्नईत आता पुनर्वसनावर भर
By admin | Published: December 08, 2015 2:16 AM