कटक : चेन्नई सुपरकिंग्सला बुधवारी आयपीएल- ७ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध लढत द्यावी लागेल. हा सामना अत्यंत रोमहर्षक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंजाबने चेन्नईचा ‘विजयी रथ’ रोखून त्यांना पराभवाची धूळ चारली होती. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाखालील चेन्नई संघ मागच्या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. सुरुवातीच्या पराभवानंतर मात्र चेन्नईने सर्व, सहाही सामने जिंकून तालिकेत अव्वल स्थान पटकावले. पंजाबने पहिल्या पाच सामन्यांत ओळीने सर्व संघांना हरविले; पण मुंबईने सहाव्या सामन्यात त्यांना पराभवाची चव चाखवली होती. चेन्नईसाठी सलामीवीर ब्रँडन मॅक्युलम आणि ड्वेन स्मिथ यांनी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवून झकास सुरुवात करून दिली आहे. पंजाबसाठी हे काम ग्लेन मॅक्सवेल करीत आहे. हे तिघेही यंदा धावा काढण्यात आघाडीवर आहेत. मॅक्सवेल नंबर वन, स्मिथ नंबर दोन तर मॅक्युलम तिसर्या स्थानावर आहे. उद्या कोण पुढे जातो, याकडे नजरा लागलेल्या आहेत. चेन्नईकडे सुरेश रैना तर पंजाबकडे डेव्हिड मिलर हे मोक्याच्या क्षणी संघासाठी धावून येत आहेत. पंजाबसाठी मॅक्सवेलशिवाय चेतेश्वर पूजारा आणि वीरेंद्र सेहवाग हेदेखील योगदान देत आहेत. यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा हादेखील फलंदाजीत उपयुक्त ठरत आहे. त्याने मुंबईविरुद्ध चुणूक दाखवली होती; पण कर्णधार जॉर्ज बेली याला स्वत:ची जबाबदारी ओळखावी लागेल. चेन्नईचा मारा भक्कम आहे. मोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा हे प्रभावी ठरले. मोहितने १२, तर जडेजाने ११ बळी घेतले. आश्विन आणि हिल्फेन्हास यांनीही प्रत्येकी सात बळी घेऊन साथ दिली. (वृत्तसंस्था)
चेन्नई पंजाबमध्ये काट्याची लढत
By admin | Published: May 07, 2014 3:17 AM