मुंबई - दिवाळी म्हटलं की सगळ्यांना उत्सुकता असते ती बोनस आणि गिफ्ट मिळण्याची. सरकारी नोकरदारांपासून ते कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते खासगी दुकानात कामाला असलेल्या कामगारांमध्येही यंदा बोनस काय मिळणार, याचीच चर्चा असते. मात्र, जर तुम्हाला दिवाळी बोनस म्हणून बााईक किंवा कार मिळाली तर. होय, तामिळनाडूतील एका सोन्याच्या दुकानदाराने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि दुचाकी गाड्या बोनस म्हणून देऊ केल्या आहेत. त्यासाठी, चेन्नईतील या ज्वेलरी शॉप मालकाने तब्बल १.२ कोटी रुपये खर्च केले आहेत.
दिवाळीच्या सणाला आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी चेन्नईतील ज्लेलरी शॉपमालक जयंती लाल चयांती यांनी चलानी ज्वेलर्समधील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एकूण ८ कार आणि १८ बाईक खरेदी केल्या आहेत. त्यासाठी, त्यांनी १.२ कोटी रुपये खर्च केले आहेत. मालकांकडून यंदा दिवाळी गिफ्ट म्हणून कार आणि बाईक मिळाल्याने दुकानातील कर्मचाऱ्यांनाही अत्यानंद झाला आहे. तर, मालकाचे हे प्रेम पाहून काहींच्या डोळ्यात अश्रूही तरळले.
ज्वेलरी शॉपचे मालक जयंतीलाल यांनी म्हटले की, माझा स्टाफ हा माझ्यासाठी कुटुंबाप्रमाणेच आहे. माझ्या चांगल्या-वाईट काळात याच स्टाफने माझ्यासोबत, माझ्यासाठी काम केलंय. या गिफ्टच्या माध्यमातून मी त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण देण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे आपल्या कामाप्रती प्रोत्साहन वाढविण्यासाठीच हा दिवाळी बोनस आहे. मी कुटुंबप्रमुख या नात्याने घरातील व्यक्तींप्रमाणेच यांनाही सरप्राईज गिफ्ट दिलं आहे. कारण, माझ्या व्यवसायातील नफ्यात यांचाही वाटा आहे, असेही जयंतीलाल यांनी म्हटले.