चेन्नई - पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने चेन्नई येथील आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑफिसमध्ये पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांनी ऑफिसला न येता त्यांना शक्य होईल अशा ठिकाणाहून काम करावं असं सांगण्यात आलं आहे.
सध्या चेन्नई शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. अनेक भागात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पैसे देऊनही पाणी मिळेल याची खात्री नाही. चेन्नई शहराची लोकसंख्या कोट्यावधीच्या घरात आहे. मागील अनेक दिवसांपासून चेन्नईमध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत आहे. यंदाही समाधानकारक पाऊस झाला नाही तर चेन्नईवर पाणीटंचाईचं संकट उभं राहणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 12 कंपन्यातील 5 हजार कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. चार वर्षापूर्वी खाजगी टँकरने संप पुकारला होता त्यावेळी आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले होते. चेन्नईच्या ओएमआरमध्ये अनेक आयटी कंपन्या आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग काम करतात. त्यामुळे पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. जवळपास 55 टक्के पाण्याचा वापर आयटी कंपन्यातील कर्मचारी वर्ग करतात. साधारणपणे 3 कोटी लीटर पाणी खर्च केले जाते.
चेन्नईला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र पावसाचे पाणी साठवण्याबाबत राज्य सरकार उदासीन आहे. चेन्नईत उपलब्ध असलेल्या स्त्रोतांपेक्षा शेकडो पटींनी लोकसंख्या वाढली. इमारती उभ्या राहिला. आयटी कंपन्या आल्या. चेन्नईची भौगोलिक अवस्था पाहिली तर साऊथ वेस्ट मान्सून आणि नॉर्थ ईस्ट मान्सून अशा दोन मोसमात पाऊस पडतो. पण गेल्यावर्षी पावसाने चेन्नई आणि एकूणच तामिळनाडूला दगा दिला. एप्रिल-मे महिन्यात परिस्थिती इतकी कठीण झाली की टँकरशिवाय पर्याय उरला नाही.
पाणी जपून वापरण्यासाठी अनेक संदेश आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिले जातात. पाण्याची जितकी गरज असेल तितकाच उपयोग करावा. आयटी कंपन्यांना पाण्याचे पुरवठा करणारे टॅँकरही उपलब्ध होताना अडचण होत आहे त्यामुळे पाणीटंचाईचा फटका चेन्नईमधील अनेक कंपन्यांना बसला आहे.