नवी दिल्ली - सीने में जलन, आँखों में तूफ़ान सा क्यों है इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है? क्या बताएँगे साहेब, सब जानकर अंजान क्यों हैं? या गाण्यांच्या ओळीमधून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी दिल्लीतल्या प्रदूषणावर भाष्य केले तसेच ज्यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी आहे त्यांच्यावरही उपरोधिक टीका केली. राहुल गांधी यांनी टि्वट केलेल्या गाण्याच्या ओळी या 1978 सालच्या 'गमन' चित्रपटातील आहेत.
दिल्सी-एनसीआर आणि बहुतांश उत्तर भारत मागच्या आठवडयाभरापासून प्रदूषणाचा सामना करत आहे. गाडया, कंपन्या आणि बांधकामामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होतेचं पण सध्या पंजाब-हरयाणामध्ये पिकांचा कडबा जाळण्यात येत आहे त्यामुळे प्रदूषणात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. दिल्लीत वाढलेल्या या प्रदूषणासाठी आप सरकारने हरयाणातील भाजपा आणि पंजाबमधील काँग्रेस सरकारला जबाबदार धरले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केंद्रातल्या भाजपा सरकारला प्रदूषणासाठी जबाबदार धरले आहे.
प्रदूषणामुळे भारताची राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरतो आहे. भविष्यात ऑक्सिजनच्या टाक्या पाठीवर घेऊन फिरावे लागते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ७ नोव्हेंबर २०१७ हा दिवस दिल्लीच्या इतिहासातील सर्वात प्रदूषित दिवस ठरला. पीएम २.५ चे कमाल स्तर १५५६ इतके नोंदविण्यात आले. दिल्लीच्या प्रदूषणाचा हा स्तर लंडनपेक्षा १००, पॅरिसपेक्षा ८५, तर बीजिंगपेक्षा १८ पट जास्त होता. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाच्या आकडेवारीनुसार याआधी १ नोव्हेंबर २०१६ रोजी पीएम २.५ सर्वाधिक ४०१ नोंदल्या गेला होता.
वेगवेगळे जळतण आणि कचरा उघड्यावर जाळल्याचा हा परिणाम. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हवा प्रदूषित होण्याचे सर्वात मोठे कारण हेच सांगितले जात आहे. दरवर्षी ५० टक्के प्रदूषण याच कारणामुळे होते. रस्त्यावरील धुळीमुळे ३५ टक्के, वाहनांमुळे २५ ते ३६ टक्के, तर बांधकामामुळे २० टक्क्यांपर्यंत प्रदूषण होते. लॅन्सेट या प्रसिद्ध नियतकालिकाच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी या प्रदूषणामुळे २५ लाख जणांचा मृत्यू होतो. याचाच अर्थ त्यावर्षी भारतात एड्स, मलेरिया आणि क्षयरोग यांनी एकत्रित झालेल्या मृत्यूंपेक्षा प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जास्त होती.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील हवा मागील पाच वर्षांत आठपट दूषित झाली आहे. पीएम २.५ हे कण अतिशय सृूक्ष्म असतात. ते मानवी केसाच्या व्यासाच्या तीन टक्के आकाराचे असतात आणि अगदी सहजपणे आपल्या रक्तात मिसळून जाऊ शकतात. हे कण श्वासाद्वारे फुप्फुस आणि हृदयाच्या धमण्यांमध्ये जातात. त्यामुळे कॅन्सरसह हृदयाच्या आजारांची शक्यता वाढत असते. दिल्लीत असे घडणार याची कल्पना आधीच दिली गेली होती.