मध्यप्रदेशच्या छतरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थी सार्थक टिकरिया याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. सार्थकच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी कॉर्निया दान करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सार्थकचे वडील आलोक टिकरिया यांनी सांगितले की, ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो आणि मुलाला जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आयसीयूमध्ये नेण्यात वेळ वाया गेला. त्याचवेळी सार्थकच्या वडिलांनी सांगितले की, आम्हाला त्याला आठवणींमध्ये जिवंत ठेवायचे आहे, त्यामुळे त्याचे डोळे दान केले.
वडिलांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, मी माझा मुलगा गमावला आहे परंतु मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की ही परिस्थिती सुधारावी आणि गंभीर रूग्णांसाठी लिफ्ट आरक्षित करा किंवा आयसीयू तळमजल्यावर हलवा. टिकरिया रडत म्हणाले की, माझा मुलगा मला सतत पप्पा मला वाचवा असं सांगत होता. सार्थक तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होता आणि त्याला कधीही तब्येतीची समस्या नव्हती. आम्ही एकत्र कुटुंबात राहतो, 14 लोक आणि मुलं आहेत. तो दिवसभर इकडे तिकडे धावायचा. पण कशाचीही तक्रार करत नसे.
काही महिन्यांपूर्वी त्याला रक्तदान करायचं आहे. तो लहान असल्याने त्याला परवानगी नाकारण्यात आली. टिकरिया म्हणाले की, त्याला एमपी बोर्डमधून शिक्षण घ्यायचं होतं म्हणून आम्ही नवीन ठिकाणी प्रवेश घेतला आणि सोमवार त्याचा पहिलाच दिवस होता. सकाळी 9.15 च्या सुमारास आम्हाला फोन आला आणि 9.45 वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. सार्थकची तब्येत बिघडली तेव्हा तो शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर होता. तेथून जिल्हा रुग्णालयाचे अंतर दीड किमी आहे.
ट्रॅफिक जॅममुळे आणखी 10 मिनिटांचा वेळ गेला. रुग्णालयातील डॉक्टरांनी आम्हाला दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आयसीयूमध्ये नेण्यास सांगितले. रुग्णालयात चार लिफ्ट आहेत पण एकही आयसीयू किंवा गंभीर रुग्णांसाठी नाही. आयसीयूमध्ये पोहोचण्यासाठी सुमारे 10 मिनिटं वाट पाहावी लागली असं सार्थकच्या वडिलांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.