गुजरातमधील केवडिया येथे आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या उत्सवाची थीम ही दुर्ग रायगड आहे. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला ऐतिहासिक दुर्ग... मराठा साम्राज्याचे प्रतिक असलेल्या या रायगडाची ख्याती जगभर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर व्यक्त होताना, रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेचे आणि शौर्याचे उदाहरण आहे, असे म्हटले. आज ३१ ऑक्टोबर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवशी राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर मराठीत पोस्ट करत म्हटले की, रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानतेचे आणि शौर्याचे उदाहरण आहे. ते धैर्य आणि निर्भयतेचे प्रतिक आहे. यंदाच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात रायगडाला मानाचे स्थान दिले गेले याचा मला आनंद आहे.
दरम्यान, दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांना केवडिया येथे अभिवादन केले. यावेळी मोदी म्हणाले की, विकास आणि विश्वासाची एकता विकसित भारताच्या निर्मितीला चालना देते. प्रत्येक योजना, धोरण आणि हेतूमध्ये असलेली एकता ही आपली शक्ती आहे. हे पाहून सरदार वल्लभभाई पटेलांचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देत असेल. गेल्या १० वर्षांचा कालावधी भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी अभूतपूर्व कामगिरीने भरलेला राहिला आहे. आज सरकारच्या प्रत्येक कामात आणि प्रत्येक कार्यात राष्ट्रीय एकात्मतेची बांधिलकी दिसून येते.