रायपूर - छत्तीसगडमधील धनिकरका येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी (18 एप्रिल) चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या कुआकोंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धनिकरका वन क्षेत्रात गुरुवारी ही चकमक सुरू झाली. यामध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर चकमकी दरम्यान एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला आहे. सकाळी सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले असून त्यामध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर वर्गीसचा समावेश आहे. वर्गीसवर पाच लाखांचे बक्षिस होते.
छत्तीसगडमधील चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा
सुकमामधील बिमापूरममध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (26 मार्च) चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील जागरगुंडा येथे नक्षलवादी आणि कमांडो बटालियन दरम्यान चकमक झाली होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. बिमापूरमपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर ही चकमक झाली. कोबरा 201 बटालियनचे कमांडो सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी कमांडोंच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला होता. या गोळीबारात 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. या चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले. नक्षलवाद्यांकडून 1 रायफल आणि दोन थ्री नॉट थ्री रायफल ताब्यात घेण्यात आल्या होत्या.
Naxal Encounter : जवानांच्या चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा
झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत पीपल्स लिबरेशन फ्रंटचा (पीएलएफआय) एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. या नक्षलवादी संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई राबवली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास जवानांनी पीएलएफआयच्या नक्षलवाद्याला कंठस्नान घातले होते.
रांचीचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) ए.बी.होमकर यांनी कारवाईबाबत माहिती दिली होती. होमकर म्हणाले की, रनिया पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये गुरूवारी पहाटेच्या सुमारास चमकम उडाली होती. नक्षलविरोधी मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. दरम्यान, जवानांनी घटनास्थळावरुन शस्त्रसाठा ताब्यात घेतला होता.
छत्तीसगडमधील चकमकीत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमधील बीजापूर येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गुरुवारी (7 फेब्रुवारी) सकाळी चकमक झाली होती. या चकमकीत दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता. एसपी मोहित गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रीक्ट रिझर्व गार्ड्सच्या जवानांनी ही कामगिरी बजावली होती. याआधी झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी (29 जानेवारी) चकमक झाली होती. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता.