रायपूर - छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यात एक भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत कारमधील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर स्वरुपात जखमी झाला आहे. रायपूर जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंदिर हसौद पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अटल नगर परिसरात एक भरधाव कार रस्त्याशेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली.या घटनेत झारखंडमधील रवि कुमार तिवारी (22 वर्ष), कोलकात्यातील ओमेर आलम (25 वर्ष) आणि रायपूरमधील मनाल कोसरिया (24 वर्ष) या तिघांचा मृत्यू झाला. तर कोलकात्यातीलच रहिवासी असलेला सौरभ साह (22 वर्ष) हा गंभीर जखमी झाली आहे.
अधिकाऱ्यांनी असंही सांगितले की, मृत पावलेले सर्वजण अटल नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होते. मंगळवारी (29 जानेवारी) रात्रीच्या सुमारास हे चारही जण मंदिर हसौद परिसराच्या दिशेनं गेले. अटल नगर परिसरात आल्यानंतर त्यांची कार रस्त्याशेजारी असणाऱ्या खोल खड्ड्यात जाऊन पडली.
(मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी)
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी तीन मृतदेह आणि जखमीला हॉस्पिटलमध्ये नेले. दरम्यान, हे चारही जण दारूच्या नशेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण त्यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्याही आढळून आल्या आहेत.