रायपूर - छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज भीषण चकमक झाली असून, या चकमकीत बीएसएफच्या चार जवानांना वीरमरण आले आहे. तर अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. कांकेरमधील प्रतापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महला गाव येथे बीएसएफच्या 114 व्या बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक उडाली. दरम्यान, जखमी जवानांना पखांजूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांकडून आपल्या प्रभावक्षेत्रातील नागरिकांना सातत्याने धमक्या देण्यात येत आहेत. त्यासाठी नक्षलवाद्यांकडून पत्रके वाटण्यात येत आहेत, तसेच बॅनरबाजी होत आहे. त्याबरोबरच नक्षलवादी या भागात सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य करत आहेत. कांकेरमधील पखांजूर येथेही नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. नक्षलवादविरोधी ऑपरेशनचे डीआयजी सुंदराज यांनी याली दुजोरा दिला आहे. दरम्यान सुंदराज यांनी नक्षवाद्यांसोबतच्या चकमकीत चाज जवानांना वीरमरण आल्याची माहिती दिली आहे.