Chhattisgarh Accident : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात एक भीषण अपघा झाला आहे. जिल्ह्यातील कोरेरजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात सात शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑटोचालक शाळा सुटल्यानंतर मुलांना घेऊन परतत असताना ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात एवढा भीषण होता की ऑटोचा चक्काचूर झाला. 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर कोरेर रुग्णालयात 5 मुलांचा मृत्यू झाला. ऑटोमध्ये चालक आणि आठ मुलांसह 9 जण होते. सर्व मुले 5 ते 8 वयोगटातील आहेत. चालक आणि एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केला शोक मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करुन कांकेर येथील कोरेर चिल्हाटी चौकात ऑटो आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, ही बातमी अत्यंत दु:खद आहे. आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. देव कुटुंबीयांना धीर देवो. प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.