छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डीजेच्या आवाजामुळे एका व्यक्तीची नस फुटली आणि त्याला ब्रेन हॅमरेज झालं. त्यानंतर त्याला अंबिकापूर जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याच दरम्यान, व्यक्तीची गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्याला रायपूर रुग्णालयात रेफर केलं आहे. डीजेच्या आवाजामुळे डोक्याच्या मागच्या बाजूची नस फुटून रक्त गोठल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बलरामपूर जिल्ह्यातील सनवल येथे राहणारे ४० वर्षीय संजय जयस्वाल यांना ९ सप्टेंबर रोजी अचानक चक्कर येऊ लागली आणि उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. वरिष्ठ डॉक्टर डॉ. शैलेंद्र गुप्ता यांनी त्यांचं सीटी स्कॅन करून रिपोर्ट पाहिला तेव्हा त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूची नस फुटल्यामुळे रक्त गोठल्याचं आढळून आले..
डॉ. गुप्ता यांनी सांगितलं की, रुग्णाला पूर्वीच्या आजाराबाबत विचारलं असता, त्यांनी असा कोणताही आजार नसल्याचं सांगितलं. रुग्णाने बीपीची तक्रारही केली नाही. हॉस्पिटलमध्येही त्यांचे बीपी नॉर्मल होते. आतापर्यंतची ही पहिलीच केस आहे जी चिंतेची बाब आहे. कारण सध्या लग्नसराईसह धार्मिक आणि इतर प्रसंगी डीजे इत्यादी मोठ्या आवाजाच्या यंत्रांचा वापर वाढला आहे, तो माणसांसाठी अत्यंत घातक ठरत आहे.
निरोगी माणूस ७० डेसिबलच्या आवाजाची तीव्रता सहन करू शकतो. पण यापेक्षाही जास्त हा त्याच्यासाठी हानिकारक आहेच पण कान आणि मेंदूसाठीही अत्यंत घातक आहे. डीजेमधून बाहेर पडणाऱ्या आवाजाची तीव्रता १५० डेसिबलपेक्षा जास्त असते. या व्यक्तीचा डीजेचा व्यवसाय आहे. ज्या दिवशी तब्येत बिघडली त्या दिवशी ते डीजेच्या संपर्कात होते. त्यांना उलट्या झाल्या आणि चक्कर आली अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.