पक्षासाठी काय'पण'! भाजपा उमेदवार पराभूत झाल्यास 'हा' गडी कापणार मिशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:44 PM2018-12-04T17:44:17+5:302018-12-04T17:45:58+5:30
रायगढ जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर
रायगढ: छत्तीसगढमधील रायगढ जिल्ह्यातील खरसिया विधानसभा मतदारसंघाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपात काँटे की टक्कर पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून तरुण उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष उमेश पटेल मैदानात आहेत. तर भाजपानं जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिलेल्या ओ. पी. चौधरींना तिकीट दिलं आहे. चौधरींच्या विजयासाठी भाजपानं पूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळेच चौधरीच निवडणूक जिंकतील, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. श्रवण श्रीवानी यांनी एक अजब पण केला आहे. चौधरी पराभूत झाल्यास आपण मिशी कापू, असं श्रीवानी यांनी म्हटलं आहे.
डॉ. श्रवण श्रीवानी हे भाजपाचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी ओ. पी. चौधरी यांच्या विजयाची खात्री आहे. त्यामुळेच चौधरी पराभूत झाले, तर आपण मिशी कापू, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. आपल्याला मतदारांवर पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले. 'मतदारांनी ज्या पद्धतीनं चौधरी यांना पाठिंबा दिला आहे, ते पाहता त्यांचा विजय पक्का आहे. जर त्यांचा पराभव झाला, तर आयुष्यभर मिशांशिवाय फिरेन,' असा पण श्रीवानी यांनी केला आहे.
काँग्रेसचे उमेश पटेल आणि भाजपाचे ओ. पी. चौधरी हे समवयस्क आहेत. दोन तरुण उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. हे दोन्ही नेते मतदारसंघात लोकप्रिय असल्यानं निवडणुकीच्या निकालाकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. खरसिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र चौधरी यांनी दिलेल्या आव्हानामुळे या मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळते आहे. याआधी हा मतदारसंघ काँग्रेसनं अगदी लिलया जिंकला होता. मात्र आता भाजपानं कंबर कसल्यानं काँग्रेसची वाट बिकट झाली आहे. 11 डिसेंबरला छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे.