सात वेळा आमदार राहिलेला मंत्री पराभूत; समाजाच्या एकीमुळे शेतकरी बनला 'भाजपा'चा आमदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 13:43 IST2023-12-04T13:42:53+5:302023-12-04T13:43:22+5:30
ishwar sahu news : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले.

सात वेळा आमदार राहिलेला मंत्री पराभूत; समाजाच्या एकीमुळे शेतकरी बनला 'भाजपा'चा आमदार
रायपूर : लोकसभा २०२४ च्या सेमी फायनलमध्ये अर्थात ४ राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३-१ असा विजय मिळवला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येभाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं. तर तेलंगाणात केसीआर यांच्या पक्षाचा पराभव झाला अन् जनतेनं सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडं सोपवल्या. राजस्थानच्या जनतेनं आपली परंपरा कायम राखत सत्ताबदल केला. खरं तर १९९० पासून राजस्थानात एकदाही एका पक्षाला सलग दोनदा सत्ता मिळवता आलेली नाही. मात्र, छत्तीसगडच्या निकालानं सर्वांना धक्का दिला. कारण भूपेश बघेल यांची प्रचंड लोकप्रियता असताना देखील काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं.
दरम्यान, छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यातील साजा विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. इथं भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होती. पण, एका सामान्य कुटुंबातील शेतकरी ईश्वर साहू यांनी सात वेळा आमदार राहिलेल्या उमेदवाराचा पराभव करून मोठा धक्का दिला. या जागेवरून साहू यांच्याविरोधात मंत्री रविंद्र चौबे मैदानात होते. खरं तर दुसऱ्या समुदायाच्या जमावाने केलेल्या हिंसाचारात साहू यांनी आपल्या 'लेका'ला गमावले. साहू यांच्या मुलाची निघृण हत्या केल्यामुळंं जनतेत संतापाची लाट होती, ज्याचेच परिणाम निकालात दिसून आले.
ईश्वर साहू यांचा विजय
भारतीय जनता पक्षानं जनतेचा आक्रोश पाहून ईश्वर साहू यांना तिकिट दिलं. साहू यांनी एकूण १०१७८९ मतं मिळवली आणि चौबे यांना ५१९६ मतांनी पराभवाची धूळ चारली. साजा विधानसभा मतदारसंघात एप्रिलमध्ये धार्मिक दंगली झाल्या होत्या. शाळेतील भांडणापासून सुरू झालेल्या या दंगलीने धार्मिक हिंसाचाराचं रूप घेतलं. वाद वाढल्यानं हिंसाचाराची आग सर्वत्र पसरली. घरं जाळण्यात आली, निष्पापांना नाहक त्रास सहन करावा लागला. याच हिंसाचारात ईश्वर साहू यांचा मुलगा भुवनेश्वर साहू याची हत्या करण्यात आली. मग भाजपाने मृत भुवनेश्वरच्या वडिलांना तिकिट दिलं आणि ते आमदार बनले.
ईश्वर साहू यांच्या विजयानंतर राजकीय पंडित आपापली मतं मांडत असून, भावनिकतेच्या मुद्द्यामुळे साहू यांचा विजय झाला असल्याचं सांगत आहेत. साजा मतदारसंघात ६० हजार मतदार हा 'साहू' आहे आणि याचाच फायदा ईश्वर साहू यांना झाला. साहू समाजाने एकत्रित येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात मतदान केलं अन् आपल्याच समाजाचा उमेदवार निवडून आणला.