रायपूर- छत्तीसगड निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांची नावं जाहीर झाली असून, उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये भाजपा सरकारमधील 9 मंत्र्यांसमोर काँग्रेसचं कडवं आव्हान राहणार आहे. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाच्या टप्प्यात अनेक उमेदवार मतदारांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अंबिकापूर विधानसभेच्या जागेवरून भाजपाच्या अनुराग सिंहदेव यांच्यापुढे टीएस सिंहदेव यांचं आव्हान राहणार आहे. तर काँग्रेसच्या चरणदास महंत यांची सक्ती विधानसभा जागेवर स्थिती मजबूत आहे. त्यांच्या विरोधात भाजपानं मेधाराम साहू यांना मैदानात उतरवलं आहे. तर दुसरीकडे ताम्रध्वज साहू यांचा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. ते दुर्गच्या ग्रामीण विधानसभेच्या जागेवरून काँग्रेसचे उमेदवार आहेत. साहू हे दुर्ग लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांची सरळ सरळ भाजपाच्या जागेश्वर साहू यांच्याशी लढत आहे.
रायपूरच्या ग्रामीण विधानसभा जागेवरूनही सत्यनारायण शर्मा यांना त्रिशंकू संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. त्यांना भाजपाचे नंदे साहू आणि जनता काँग्रेसचे ओमप्रकाश देवांगण यांच्याकडून कडवी लढत मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष राहिलेल्या शिव डहरिया यांना आरंगमधून भाजपा उमेदवार संजय ढीढी यांच्याकडून आव्हान आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भुपेश बघेल यांचाही मतदारसंघात जबरदस्त प्रभाव आहे. त्याचा सामना भाजपाच्या मोतीलाल साहू यांच्याशी होणार आहे.
भाजपाही विद्यमान मंत्र्यांच्या विजयावरून साशंक आहे. राज्याचे पंचायत मंत्री अजय चंद्राकर हे त्रिकोणी लढतीत सापडले आहेत. त्यांना काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नीलम चंद्राकर कडवी झुंज देत आहेत. इथे काँग्रेसच्या लक्ष्मीकांता साहू यांचाही प्रभाव आहे. त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. तर बिलासपूर विधानसभा जागेवरून राज्याचे अबकारी मंत्री अमर अग्रवाल यांना काँग्रेसच्या शैलेश पांडे यांच्याकडून कडवी झुंज मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय. रायपूर पश्चिमेकडच्या मतदारसंघातही बांधकाम मंत्री राजेश मूणत यांचा काँग्रेसच्या विकास उपाध्याय यांच्याशी सामना होणार आहे. रायपूर दक्षिणमधून राज्याचे कृषिमंत्री बृजमोहन अग्रवाल विजयासाठी पुन्हा सज्ज आहेत. त्यांचा मुकाबला काँग्रेसच्या कन्हैय्या अग्रवाल यांच्याशी होणार आहे.भिलाईमध्येही राज्याचे उच्च शिक्षणमंत्री प्रेम प्रकाश पांडे यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार देवेंद्र यादव यांचं आव्हान राहणार आहे. अन्नपुरवठा मंत्री पुन्नूलाल मोहले यांना मुंगेली विधानसभा जागेवरून काँग्रेसच्या राकेश पात्रेंकडून कडवी झुंज मिळण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती क्रीडा मंत्री भईया लाल रजवाडे यांच्या मतदारसंघात आहे. त्यांना बैकुंठपूरमधून काँग्रेसच्या अंबिका सिंहदेव यांचं आव्हान असणार आहे. छत्तीसगडमध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. सकाळी आठपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. राज्यातील ऊर्वरित 72 जागांवरून 1079 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.