रायपूर: भाजपा खासदार सरोज पांडे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पातळी सोडली आहे. सरोज पांडे यांनी राहुल यांनी मंदबुद्धी म्हटलं आहे. 'वयाची चाळिशी उलटून गेल्यावरही राहुल गांधींना अजून काही गोष्टी समजत नाही. ते अजूनही त्या गोष्टी समजून घेत आहेत. अशा व्यक्तीला मंदबुद्धीच म्हणता येईल,' असं पांडे म्हणाल्या. 'राहुल गांधी यांना पाहून मला आश्चर्य वाटतं. ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र त्यांना अजून काही गोष्टी माहिती नाहीत. वयाची चाळिशी उलटून गेल्यावरही राहुल त्या गोष्टी समजून घेत आहेत. अशा माणसाला मंदबुद्धीच म्हणता येईल,' असं भाजपाच्या राज्यसभेतील खासदार सरोज पांडे म्हणाल्या. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या सरोज पांडे छत्तीसगडमधून राज्यसभेवर गेल्या आहेत. मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या लेखराम साहू यांचा पराभव केला. गेल्या आठवड्यात राहुल गांधींनी मोदी सरकारच्या ध्येयधोरणांवर टीका केली होती. 'कोकाकोला कंपनीचे मालक आधी सरबत विकायचे. मॅक्डॉनल्ड सुरुवातीला ढाबा चालवायचे. मात्र सरकारच्या अनुकूल धोरणांमुळे त्यांनी भरारी घेतली,' असं म्हणत राहुल यांनी रोजगाराच्या मुद्यावरुन मोदींना लक्ष्य केलं होतं. मोदींच्या काळात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याचं राहुल यांनी म्हटलं होतं.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंदबुद्धी; भाजपाच्या खासदार बरळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 11:27 AM