राजकारण तापलं! "छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सोनिया गांधींचे ATM"; भाजपाचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 11:33 AM2022-10-13T11:33:01+5:302022-10-13T11:39:27+5:30
Congress Sonia Gandhi : ईडीच्या कारवाईदरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह (Raman Singh) यांनी विधान केलं आहे. ज्यामुळे मोठा वाद आता निर्माण झाला आहे
छत्तीसगडमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. ईडीच्या कारवाईदरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह (Raman Singh) यांनी विधान केलं आहे. ज्यामुळे मोठा वाद आता निर्माण झाला आहे. छत्तीसगडचे सध्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांचे ATM आहेत, असं विधान केलं आहे. यावरून भूपेश बघेल (Bhupesh Baghel) संतापले आहेत.
भूपेश बघेल यांनी रमण सिंह यांना आधी या वक्तव्याचा पुरावा द्या नाहीतर मानहानीचा दावा ठोकतो, असा गंभीर इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. राज्यातील या ईडीच्या छापेमारीवर माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी हे विधान केलं आहे. "सध्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सोनिया गांधींचे एटीएम असल्याचं मी वर्षभरापासून सांगतोय. हा हजारो कोटींचा घोटाळा आहे."
"जमा झालेला पैसा आसाम, त्यानंतर हिमाचल प्रदेशात पाठवला जातो. कलेक्टरला कलेक्शन एजंट बनवलंय. आज त्याच एजंटच्या घरावर ईडी छापेमारी करत आहे" असा आरोप रमण सिंह यांनी केला आहे. तसेच आता काँग्रेस संपुष्टात येण्याची वेळ जवळ आली आहे. त्यासाठीच आम्ही देशभर लढत आहोत. जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे, असंही म्हटलं आहे.
रमण सिंहांना प्रत्युत्तर देताना भूपेश बघेल यांनी तुमचे आरोप आधी सिद्ध करा किंवा जाहीर माफी मागा. नाही तर योग्य ती कारवाई करून मानहानीचा दावा ठोकण्यात येईल असं सांगितलं. ईडीच्या कारवायांना घाबरतो कोण? ज्यांच्या मनात भीती आहे, तेच घाबरतात असं देखील बघेल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"