सुकमा : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. मात्र, या चकमकीत दोन जवानही शहीद झाले आहेत.
सुकमा जिल्ह्यातील किस्ताराम येथील जंगल परिसरात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक उडाली. सुरक्षा रक्षक गस्तीवर असताना या चकमकीला सुरूवात झाली. दोन्ही बाजूकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर दोन जवान शहीद झाले.
सुकमा येथील पोलीस अधिकारी अभिषेक मीणा यांनी सांगितले की, आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र, यावेळी झालेल्या चकमकीत डीआरजीचे दोन जवान शहीद झाले आहेत. एसटीएफ आणि डीआरजी यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. सुकमा जिल्ह्यातील सकलार गावात नक्षली लपून बसले होते. तसेच, त्याठिकाणी अद्यापही गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, आज सकाळी सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा येथेही नक्षली आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक उडाली होती, यामध्ये एका जखमी नक्षलवाद्याला अटक करण्यात आली आहे.