दहशतवाद्यांचा खात्मा करणारा 'जवान' आमदार! १७ हजारांच्या मतांनी विजय; मंत्र्याचा दारूण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 02:33 PM2023-12-04T14:33:10+5:302023-12-04T14:34:04+5:30
लोकसभा निवडणुकीच्या सेमी फायनलमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला.
लोकसभा निवडणुकीच्या सेमी फायनलमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपाने सत्ता मिळवली. तर, तेलंगणात दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीला रोखण्यात काँग्रेसला यश आले. छत्तीसगडमधील निकालाने राजकीय पंडिताचा पोल चुकीचा ठरवला. प्रचंड लोकप्रियता असताना देखील भूपेश बघेल यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचा पराभव झाला. छत्तीसगडमध्ये भाजपाने ९० पैकी ५४ जागा जिंकत बहुमत मिळवले तर काँग्रेसला ३५ जागांवर समाधान मानावं लागलं.
दरम्यान, छत्तीसगडच्या निवडणुकीला अनेक कारणांमुळे अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यातीलच एक कारण म्हणजे इथे एका सीआरपीएफमधून स्वेच्छेने निवृत्ती घेतलेल्या जवानानं आमदार होण्याचा मान पटकावला. हवालदार राम कुमार टोप्पोंच्या या विजयाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ते ३१ वर्षांचे असून त्यांनी सीतापूर विधानसभा मतदारसंघातून मंत्री आणि काँग्रेस आमदार अमरजीत भगत यांचा १७ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. काही महिन्यांपूर्वीच (१ सप्टेंबर) भगत यांनी भाजपात प्रवेश केला होता. खरं तर २०२१ मध्ये त्यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
मंत्र्याचा दारूण पराभव
या वर्षाच्या सुरुवातीला सीआरपीएफमध्ये सेवा देत असलेल्या टोप्पो यांना छत्तीसगडमधील जगदलपूर येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. सीआरपीएफने पहिल्यांदाच छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून राज्यात नक्षल समस्या आता नियंत्रणात असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात नक्षलविरोधी कारवायांमध्ये केंद्रीय दल तैनात करण्यात आले आहे.
"राजीनामा देईपर्यंत मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नव्हतो. मी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. सीतापूरची जागा २० वर्षे काँग्रेसकडे होती. मी सीआरपीएफचा एक भाग असून सामाजिक कार्यातही सक्रिय होतो हे माझ्या भागातील लोकांना माहीत होते. त्यांनी मला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मी राजकारणात आलो", असे सेवारत टोप्पो यांनी 'हिंदुस्तान टाइम्स' या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
माजी सैनिक म्हणून ओळख...
टोप्पो यांनी काँग्रेस नेते भगत यांचा १७१६० मतांनी पराभव केला. टोप्पो यांना एकूण ८३०८८ मतं मिळाली तर छत्तीसगड सरकारमधील पर्यटन, संस्कृती, अन्न आणि ग्राहक मंत्री भगत यांना ६५९२८ मतं मिळाली. टोप्पो यांनी नागालँड, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश, केरळ आणि दिल्ली येथे सेवा दिली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःची ओळख माजी सैनिक राम कुमार टोप्पो अशी केली.