रायपूर – आमचे सरकार आल्यास छत्तीसगडमध्ये ५०० रुपयांत गॅस सिलेंडर मिळेल. त्याचसोबत नवीन उद्योग उभारणीसाठी युवकांना ५० टक्के अनुदान सरकार देईल. १८ लाख लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देऊ. प्रत्येक महिलेला वर्षाला १२ हजार रुपये देऊ अशाप्रकारे भाजपानं घोषणा केली आहे. आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध करून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपानं छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पुढील ५ वर्षात छत्तीसगड सर्वात विकसित राज्यांमध्ये असणार आहे. १५ वर्षात आमच्या सरकारने राज्याच्या विकासासाठी अनेक विकासकामे केली. बऱ्याच योजनांची सुरुवात केली. स्थानिक निवडणुकीत ५० टक्के महिला आरक्षण देण्यात आले. पुढील २ वर्षात १ लाख पदांसाठी भरती काढणार असल्याचं भाजपानं म्हटलं आहे. भाजपा सरकारच्या काळात २ वरून १५ मेडिकल कॉलेज निर्माण झाले. ५० इंजिनिअरींग कॉलेज आहेत. मॅनेजमेंट कॉलेजची संख्या वाढून १६ झाली. छत्तीसगडच्या विकासात सर्वात मोठे विघ्न भूपेश बघेल आहे. ते काँग्रेस पक्षाचे एटीएम आहेत. आम्ही लाखो लोकांची चर्चा करून जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे असं अमित शाह म्हणाले.
भाजपाच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने
भाजपने कृषक उन्नती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत ३१०० रुपयांना एकरी २१ क्विंटल धान खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना एकरकमी मोबदला दिला जाईल.
पुढील २ वर्षात १ लाख सरकारी रिक्तपदांसाठी भरती करणार
बेघर मजुरांना दरवर्षी १० हजार आर्थिक सहाय्य करणार
पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून प्रत्येक कुटुंबाला ५ ते १० लाखांपर्यंत आरोग्य वीमा देणार
विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याजाण्यासाठी मासिक अर्थ सहाय्य थेट खात्यात जमा करणार
प्रत्येक घरात पाणी पोहचवणार, पब्लिक सेवा आयोगाची परीक्षा पारदर्शकपणे राबवणार
सेंट्रल भारताचे इनोवेशन हब बनवण्यासाठी रायपूरमध्ये मोठे केंद्र उभारणार