Narendra Modi : "हा पक्ष जिथे आहे तिथे विकास होऊच शकत नाही"; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 17:16 IST2023-11-02T16:55:28+5:302023-11-02T17:16:48+5:30
Narendra Modi And Congress : राज्यातील सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, हा पक्ष जिथे आहे तिथे विकास होऊच शकत नाही.

Narendra Modi : "हा पक्ष जिथे आहे तिथे विकास होऊच शकत नाही"; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी छत्तीसगडमधील कांकेर येथे जनतेला संबोधित केले. राज्यातील सत्ताधारी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले की, हा पक्ष जिथे आहे तिथे विकास होऊच शकत नाही. छत्तीसगडमध्ये भाजपाच्या समर्थनार्थ वादळ वाहत असून त्याची झलक कांकेरमध्येही पाहायला मिळत आहे.
"दिल्लीमध्ये काँग्रेसचे सरकार असताना छत्तीसगड राज्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले, परंतु आम्ही छत्तीसगडच्या विकासासाठी सर्व पावले उचलली. छत्तीसगडच्या भल्यासाठी भाजपा नेहमीच काम करत आहे. काँग्रेसची गेली पाच वर्षे अपयशी ठरली आहेत. काँग्रेसने छत्तीसगडला फक्त गुन्हेगारी दिली. हे आता खपवून घेतले जाणार नाही, असे आज संपूर्ण छत्तीसगड सांगत आहे. काँग्रेसचे सरकार बदलावे लागेल."
"तुमच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करते"
"जेव्हा काँग्रेस भ्रष्टाचार करते, तेव्हा फक्त राज्यच नाही तर प्रत्येक घराचं नुकसान होतं. ती तुमच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करते. तुमच्याकडे कोळसा आहे पण तुम्हाला पुरेशी वीज मिळत नाही, काँग्रेसचे लोक तुमच्या कोळशावर कमिशन घेत आहेत. गरिबांचा विचार करणे ही भाजपा सरकारची प्राथमिकता आहे. प्रत्येक गरीब आदिवासी आणि मागासलेल्या व्यक्तीला संरक्षण देण्याचा भाजपाचा संकल्प आहे" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
"काँग्रेस सरकार गरिबांना घरे देण्यात अडथळे निर्माण करतं"
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "छत्तीसगड हे देशातील अव्वल राज्य बनवण्याचा भाजपाचा संकल्प आहे. आम्ही आमच्या सरकारमध्ये आतापर्यंत देशातील चार कोटी लोकांना घरं दिली आहेत. आमचा हा कार्यक्रम आता थांबणार नसून येथील काँग्रेस सरकार गरिबांना घरे देण्यात अडथळे निर्माण करत आहे. मोदींनी घर दिलं तर ते मोदींचं गुणगान गातील, अशी भीती त्यांना वाटत आहे."