काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी अंबिकापूरच्या सरगुजा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केलं. या बैठकीत त्यांनी छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देतानाच केंद्रातील सत्ताधारी भाजपावरही जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने 2018 मध्ये दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार करताना, पेन काढा आणि लिहा, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. 2018 मध्ये आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. छत्तीसगडशी माझं जुनं नातं आहे असं म्हटलं.
"मी तुम्हाला दोन-तीन आश्वासने दिली होती. आमचं सरकार आल्यावर दोन-तीन कामं नक्कीच होतील, असं आम्ही म्हटलं होतं. शेतकऱ्यांची कर्जमाफी हे सर्वात मोठं काम होतं, ही काही छोटी गोष्ट नव्हती. त्यावेळी भाजपाच्या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्ष खरं बोलत नसल्याचं म्हटलं होतं" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला. ते सरगुजामध्ये म्हणाले, "मोदीजींना जातनिहाय जनगणना करायची नाही. ते म्हणतात गरीब ही फक्त एक जात असते. मोदीजींच्या मते ओबीसी ही जात नाही. देश चालवण्यात मागासवर्गीयांचा सहभाग नाही. नरेंद्र मोदींकडे जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी आहे पण त्यांना ती दाखवायची नाही."