रायपूर - छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्याविरोधात रायपूर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. नंदकुमार बघेल यांच्यावर एका विशिष्ट्य समुहाविरोधात कथित आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘सर्व ब्राह्मण समाज’ कडून देण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर रायपूर डीडीनगर पोलीस ठाण्यामध्ये आयपीसी कलम ५०५ आणि १५३ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (In Chhattisgarh, the FIR was filed against the father of the Chief Minister Bhupesh Baghel, the Chief Minister said, there is no one greater than the law)
दरम्यान, यावर आता मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. कायद्यापेक्षा मोठं कुणी नाही. त्यांचे ८६ वर्षीय वडीलही कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यांच्या कथित विधानावर पोलीस योग्य ती कारवाई करतील. वडिलांसोबत माझे वैचारिक मतभेद आधीपासून आहेत. हे सर्वांना माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले. माझ्या वडिलांनी केलेल्या वक्तव्यामुळे मलाही दु:ख झाले आहे. कायद्यापेक्षा मोठा कुणीही नाही. मी मुलगा म्हणून त्यांचा आदर करतो. मात्र मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या चुकीला माफ करता येणार नाही.
गेल्या महिन्यामध्ये लखनौमध्ये आयोजित एका कार्यक्रमात नंदकुमार बघेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, आता मत आमचे आणि राज्य तुमचं असं चालणार नाही. ब्राह्मण परकीय आहेत. ज्या प्रकारे इंग्रज येथून गेले, तसेच तेसुद्धा जातील. ब्रा्ह्मणांनी वेळीच सुधरावे, नाहीतर त्यांनी येथून जाण्यासाठी तयार राहावे. ब्राह्मण आम्हाला अस्पृश्य समजतात. आमचे सारे हक्क हिरावून घेतात. आता गावामध्येही अभियान चालवून ब्राह्मणांवर बहिष्कार टाकू.
नंदकुमार बघेल यांच्या या वादग्रस्त विधानावर संपूर्ण राज्यातील ब्राह्मणनांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बघेल यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. आता रायपूरमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.