रायपूर : छत्तीसगडमधील रायपूरमध्ये पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) चार नेत्यांना अटक करण्यात आली आहे.
भाजपाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची समीक्षा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार सुमन पांडे गेले होते. या बैठकीला भाजपाचे अनेक स्थानिक नेते आणि रायपूर भाजपाचे अध्यक्ष राजीव अग्रवाल उपस्थित होते. बैठक सुरू असताना अचानक भाजपाच्या नेत्यांमध्ये आपापसांत किरकोळ वाद झाला. दरम्यान, त्यांचा वाद मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्यानंतर राजीव अग्रवाल आणि उत्कर्ष त्रिवेदी यांनी सुमन पांडे यांना व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितले. मात्र, सुमन पांडे यांनी नकार दिल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, याप्रकरणी राजीव अग्रवाल आणि इतर 3 जणांविरोधात पत्रकार सुमन पांडे यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर राजीव अग्रवाल यांच्यासह विजय व्यास, उत्कर्ष त्रिवेदी आणि दिना डोंगरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.