छत्तीसगडच्या रायपूरमधील सिलतारा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे हवा भरतानाच जेसीबीचा टायर फुटला. या घटनेत तेथे उपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. राजपाल आणि प्रांजन, अशी या मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
घटना कॅमेऱ्यात कैद -हा स्फोट एवढा भीषण होता, की टायरजवळ उभे असलेले दोन्ही तरुण हवेत फेकले गेले. एवढेच नाही, तर त्यांच्या शरीराचेही काही तुकडे आजूबाजूला पडले होते. तसेच, जेसीबीचे टायरही हवेत उडून दूरवर जावून पडले होते. याप्रकरणी सिलतारा चौकीचे प्रभारी राजेश जान पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपाल सिंग (३२) आणि प्रंजन नामदेव (३२) हे दोघेही सिलतरा भागात घनकून स्टील्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गॅरेजमध्ये काम करत होते.
हे दोघेही दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरत होते. यादरम्यान अचानक टायरचा मोठा आवाज झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.