नवी दिल्ली - सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभार अनेकदा समोर आला आहे. काहीवेळा रुग्णालयांचा निष्काळजीपणा अनेकांच्या जीवावर बेतला असून काही रुग्णांनी जीव गमावला आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना आता समोर आली आहे. छत्तीसगडमधील आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळालं आहे. सरकारी रुग्णालयातून डॉक्टरच गायब असल्याने रुग्णाला स्ट्रेचरवर झोपवून डॉक्टरांच्या घरी नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील वैकुंठपूरमधील एका जिल्हा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीची तब्येत बिघडली म्हणून नातेवाईक त्याला जिल्हा रुग्णालयात घेऊन आले. मात्र तिथे पोहचल्यावर रुग्णाच्या नातेवाईकांना धक्काच बसला. कारण रुग्णावर उपचार करण्यासाठी सरकारी रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नव्हते. रुग्णाची प्रकृती सातत्याने बिघडत होती त्यामुळे त्वरीत उपचार होणं गरजेचं होतं.
शेवटी नाईलाजाने रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला स्ट्रेचरवर झोपवून थेट डॉक्टरांच्या घराकडे धाव घेतली. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छत्तीसगडमधील सरकारी आरोग्य व्यवस्थेवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. रुग्णालयाने लेखी स्पष्टीकरण जाहीर करत या घटनेबाबत म्हटले आहे की रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वतःहून रुग्णाला डॉक्टरकडे तपासण्यासाठी नेण्याची मागणी केली होती. त्यांना तिथून पुन्हा जिथे उपचार सुरू होते तिथे पाठवण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णांना जमिनीवर ठेवून केले जातात उपचार, रुग्णालयातील भयंकर वास्तव
उत्तर प्रदेशमध्ये एकीकडे योगी सरकार मंत्र्यांची शिष्टमंडळे जिल्ह्य़ात पाठवत असून सरकारकडून सुरू असलेल्या योजना आणि सुविधांचा आढावा घेतला जात आहे. तर दुसरीकडे बांदा येथे मात्र उत्तम आरोग्य सुविधा आहेत हा मुख्यमंत्र्यांचा दावा फोल ठरल्याचं दिसत आहे. रुग्णांना रुग्णालयात बेडही मिळत नसल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. बांदा येथील जिल्हा रुग्णालयात हे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे. ट्रॉमा सेंटरमध्ये काही रुग्ण जमिनीवर पडून उपचार घेत होते. त्याचवेळी कोणीतरी त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.