रायपूर : छत्तीसगढमध्ये लाखेच्या उत्पादनास कृषीचा दर्जा मिळणार आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यासंबंधीच्या प्रस्तावास आपली सहमती दर्शविली आहे.
राज्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, छत्तीसगढमध्ये आता लाखेच्या शेतीस कृषीचा दर्जा मिळणार आहे. राज्याच्या वन विभागाच्या वतीने लाखेच्या शेतीला लाभदायक बनविण्यासाठी एक प्रस्ताव देण्यात आला होता. हा प्रस्ताव शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे, असे जाणवल्यानंतर मुख्यमंत्री बघेल यांनी त्याला सहमती दर्शविली.
अधिकाºयाने सांगितले की, यासंबंधी कृषी, वन आणि सहकार या विभागांनी समन्वय साधून लाख आणि त्यासारख्या इतर लाभदायक उत्पादनांना कृषी क्षेत्रात समाविष्ट करून घेण्यासाठी आगामी मंत्रिमंडळ बैठकीसमोर प्रस्ताव ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांनी सांगितले की, राज्यात लाखेच्या शेतीला कृषीचा दर्जा मिळाल्यास लाख उत्पादनाशी संबंधित शेतकºयांना सहकारी सोसायट्यांकडून इतर शेतकºयांप्रमाणे सहजपणे कर्ज उपलब्ध होईल.
अधिकाºयाने सांगितले की, छत्तीसगढमध्ये लाखेच्या शेतीला उज्ज्वल भविष्य आहे. येथील शेतकरी कुसुम, पळस आणि बोरीच्या झाडांवर पारंपरिक पद्धतीने लाखेची शेती करतात. तथापि, सुव्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीने लाखेची शेती होत नाही. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत शेतकºयांना अपेक्षित लाभ मिळत नाही. या पार्श्वभूमीवर वन विभागाने लाखेची शेती लाभदायक बनविण्यासाठी एक प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. यात लाखेच्या शेतीला रीतसर कृषीचा दर्जा देण्याची तसेच लाख उत्पादक शेतकºयांना इतर शेतकºयांप्रमाणे कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती वन विभागाने मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर या प्रस्तावाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल. यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी कृषी, वन आणि सहकार या विभागांना दिले आहेत. लाखेशिवाय इतरही काही शेतीपूरक उत्पादने असतील, तर त्यांचाही प्रस्तावात समावेश करण्यात यावा, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे.च्छत्तीसगढच्या उत्तर आणि दक्षिण भागातील घनदाट जंगलातील वातावरण लाखेसाठी पोषक आहे. येथेच लाखेचे उत्पादन घेतले जाते. तथापि, येथील उत्पादन पद्धती पारंपरिक असल्यामुळे उत्पादकांच्या हाती फार पैसा पडत नाही. आधुनिक उत्पादन तंत्र वापरल्यास लाखेच्या शेतीत उत्तम संधी आहेत, असे एका अधिकाºयाने सांगितले.
च्जंगातील पळस, बोर आणि कुसुमाच्या झाडावर लाख नैसर्गिकरीत्या वाढते. ती खरडवून काढण्याचे काम उत्पादक करतात. या झाडांवर जगणारे विविध परोपजीवी कीटक आपल्या शरीरातून राळेसारखा चिकट पदार्थ स्रवतात. त्यावर प्रक्रिया करून शुद्ध लाख मिळविली जाते. लाखेच्या अनेक वस्तू बनविल्या जातात. च्लाख भारताला प्राचीन काळापासून माहीत आहे. लाखेचा सर्वांत जुना आणि ठळक उल्लेख महाभारतात ‘लाक्षागृहा’च्या रूपाने येतो. लाक्षागृह म्हणजे लाखेपासून बनविलेले घर.
च्लाख ज्वलनशील असते. धडधडून पेटते. त्यामुळे पांडवांना जाळून मारण्यासाठी दुर्योधनाने पुरोचन नावाच्या स्थापत्य विशारदाकडून लाक्षागृह बनवून घेतले होते. एका अमावास्येच्या रात्री या घराला आग लावली जाते. तथापि, पांडवांना या कटाचा आधीच सुगावा लागलेला असतो. ते लाक्षागृहाखाली एक भुयार खोदून ठेवतात आणि आगीतून सहीसलामत वाचतात, अशी ही कहाणी आहे. च्भारतात अजूनही शासकीय कामकाजात सिलिंगसाठी लाखेचा वापर होतो. त्यासाठी सरकार दरवर्षी लाखेची मोठी खरेदी करते.