लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 13 राज्यांतील 88 लोकसभा जागांवर मतदान पार पडलं आहे. यासोबतच छत्तीसगडमधील तीन जागांवरही मतदान झालं. राजनांदगाव, महासमुंद आणि कांकेर या जागांवर मतदान झालं. याच दरम्यान, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राजनांदगावमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याचा आरोप केला आहे.
भूपेश बघेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत ट्विट केलं आहे. "लोकसभेचे मतदार फोन करून तक्रार करत आहेत की, ईव्हीएममध्ये इतर उमेदवारांचा फोटो मोठा आणि स्पष्ट आहे पण माझा फोटो लहान आणि तुलनेने अस्पष्ट आहे. निवडणूक आयोगाने मागितल्याप्रमाणे फोटो देण्यात आला आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेच्या दाव्याचा पर्दाफाश होतो. हे षड्यंत्र मुद्दाम केलं गेलं आहे का? मात्र याने निकाल बदलणार नाही" असं भूपेश बघेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दुसऱ्या टप्प्यात आज छत्तीसगडमधील राजनांदगाव, महासुमंद या तीन जागांवर मतदान झालं आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत या तीन जागांवर 53.09 टक्के मतदान झाले आहे. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे राजनांदगावमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. याआधी पहिल्या टप्प्यात छत्तीसगडच्या बस्तर जागेवर मतदान झाले होते.