साहेबराव नरसाळे
छत्तीसगड : पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते़ त्यामुळे छत्तीसगडमध्ये भाजप, काँगे्रस, जनता काँगे्रस, बसपा या पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे़ काही जण उमेदवारीसाठी पक्षाकडे हट्ट धरुन बसले आहेत तर काहींनी लोकसभा लढवायला थेट नकार दिला आहे़ निवडणुकीसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून, अंतर्गत गटबाजी, बंडखोरी थोेपविण्यासाठी पक्षांकडून संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरु आहे़
काँगे्रसने निवडणूक समित्यांची घोषणा केली असून, या समितीच्या प्रमुखपदी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ समितीत मोतीलाल वोरा, टी़ एस़ सिंहदेव, अरविंद नेताम यांच्यासह दहा जणांचा समावेश करण्यात आला आहे़ धनेंद्र साहू, रविंद्र चौबे, सत्यनारायण शर्मा, मोहम्मद अकबर, दिप्ती कर्मा या वरिष्ठांनाही समितीत स्थान देण्यात आले आहे़ निवडणूक समिती, निवडणूक अभियान समिती, निवडणूक समन्वय समिती, माध्यम समन्वय समिती व प्रचार समिती अशा पाच समिती लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आल्या आहेत़ प्रदेश प्रभारी पी़ एल़ पुनिया समन्वय समितीचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत़ विधानसभेतील अभूतपूर्व यशानंतर लोकसभेच्या सर्व ११ जागा जिंकण्याची तयारी काँगे्रसने केली आहे़
भाजपकडून यापूर्वीच छत्तीसगडचे तीन विभाग करुन विभागनिहाय प्रभारी नियुक्त केले आहेत़ राजेश मुनोत, केदारनाथ कश्यप, अमर अग्रवाल यांची प्रभारीपदी वर्णी लागलेली आहे़ भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी मुख्यमंत्री डॉ़ रमन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजप लोकसभेला सामोरा जाणार आहे़ विभागनिहाय संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरु आहेत़ जुने चेहरे बदलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत भाजप आहे़ मात्र, काही ठिकाणी पुन्हा जुन्याच उमेदवारांवर भाजपला विसंबून रहावे लागण्याची वेळ येणार आहे़ तर काही ठिकाणी विधानसभेतील पराभूतांना पुन्हा लोकसभेत उतरविण्याची खेळी भाजपकडून खेळली जाण्याची शक्यता आहे़ विधानसभेतील पराभवाच्या झटक्यातून भाजप पूर्ण सावरलेली दिसत नाही़ अंतर्गत गटबाजी आणि पराभवाचे चर्वितचर्वण अद्याप सुरु आहे़अजित जोगी यांच्या जनता काँगे्रस व बसपाची युती झालेली आहे़ बिलासपूर, कोरबा मतदारसंघात जनता काँग्रेस व बसपाने जोरदार तयारी सुरु केली आहे़ मात्र, जोगी काँगे्रसमध्ये विधानसभेनंतर मोठी फूट पडली आहे़ याचा फटका जोगी काँगे्रसला बसणार असल्याचे बोलले जात आहे़मतदारसंघनिहाय आढावा.
रायपूर लोकसभा मतदारसंघ सर्वसामान्य प्रवर्गासाठी राखीव आहे़ रायपूरमधून सलग सहा वेळा खासदार होण्याचा विक्रम करणारे रमेश बैस हे विद्यमान खाासदार आहेत़ रायपूर लोकसभा मतदारसंघात ९ विधानसभा मतदारसंघ आहेत़ त्यापैकी अभानपूर, आरंग (एससी), धारसिवा, रायपूर ग्रामीण, रायपूर शहर उत्तर, रायपूर शहर पश्चिम या सहा मतदारसंघात काँगे्रस तर भाटापार, रायपूर शहर दक्षिण या दोन मतदारसंघात भाजप आणि बालोदबाजार या एकमेव मतदारसंघात जनता काँगे्रसचे आमदार निवडून आलेले आहेत़ रायपूर लोकसभा मतदारसंघात रमेश बैस गेल्या अनेक वर्षांपासून खासदार आहेत़ त्यामुळे नवीन चेहरा देण्याच्या तयारीत भाजप असून, बृजमोहन अग्रवाल यांचे नाव आघाडीवर आहे़ त्याचवेळी हमखास निवडून येणारा चेहरा म्हणून बैस यांच्यासाठी भाजपात जोरदार लॉबिंग सुरु आहे़ काँग्रेसमध्ये महापौर प्रमोद दुबे यांच्या नावाची चर्चा आहे़ परंतु दुबे यांनी विधानसभेत अग्रवाल यांच्याविरोधात लढण्यास नकार दिला होता़ तर किरणमयी नायक या दोन वेळा अग्रवाल यांच्याविरोधात लढल्या़ पण हारल्यानंतरही किरणमयी यांनी अग्रवाल यांच्याविरोधात उच्च न्यायालयापर्यंत लढाई लढलेली आहे़ लढाऊ उमेदवार म्हणून किरणमयी यांची प्रतिमा आहे़ रमेश बैस व किरणमयी हे दोघेही मागासवर्गीय कुर्मी समाजाचे नेते आहेत़ त्यामुळे बैस यांच्याविरोधातही किरणमयी काट्याची टक्कर देऊ शकतात, अशी अटकळही काँगे्रसमध्ये बांधली जात आहे़दुर्ग लोकसभा मतदारसंघ सर्वसामान्य प्रवर्गासाठी आरक्षित आहे़ काँगे्रसचे ताम्रध्वज साहू हे खासदार होते़ परंतु विधानसभेत निवडून आल्यानंतर त्यांनी लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे़ दुर्ग लोकसभा मतदारसंघात ९ विधानसभा मतदारसंघ आहेत़ त्यापैकी अहिवारा (एससी), बेमेतरा, भिलाई नगर, दुर्ग ग्रामीण, दुर्ग शहर, नवागड (एससी), पाटन, साजा हे आठ काँगे्रसकडे तर वैशाली नगर हा एकमेव मतदारसंघ भाजपकडे आहे़ २०१४ मध्ये मोदी लाटेच्या विरोधात निवडून आलेले ताम्रध्वज साहू २०१९ च्या लोकसभेसाठी दुर्गमधून त्यांच्या मुलाला उमेदवारी मागू शकतात़ त्याचवेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल ज्यांच्या तालमीत घडले ते वासुदेव चंद्राकार आपली कन्या प्रतिमा यांच्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते़ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत साहू समाज भाजपच्या विरोधात गेला़ त्यामुळे भाजपकडून लढणारे १४ पैकी केवळ १ नेता साहू समाजाचा निवडून आला आहे़ त्यामुळे बघेल हे जातिय समिकरणाच्या आधारावर राजेंद्र साहू, थानेश्वर साहू यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करु शकतात, अशीही एक अटकळ बांधली जात आहे़ भाजपकडून रमशीला साहू, माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या नावाची चर्चा आहे़राजनांदगाव लोकसभा मतदारसंघ सर्वसामान्य प्रवर्गासाठी राखीव आहे़ भाजपचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह यांचे पुत्र अभिषेक हे विद्यमान खासदार आहेत़ या मतदारसंघात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत़ त्यापैकी डोंगरगाव, डोंगरगड (एससी), कवर्धा, खुज्जी, मोहला-मानपूर (एसटी), पंढरिया हे सहा मतदारसंघ काँगे्रसकडे, राजनांदगाव हा एकमेव मतदारसंघ भाजपकडे तर खैरागड मतदारसंघ जनता काँगे्रसकडे आहे़ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला़ त्यामुळे खासदार अभिषेक सिंह यांच्यावर भाजपचे वरिष्ठ नाराज आहेत़ अभिषेक सिंह यांचा पत्ता काटला जाईल, अशी चर्चा आहे़ मात्र, त्याचवेळी रमन सिंह यांना प्रदेश उपाध्यक्षपदी बढती मिळालेली आहे़ त्यामुळे रमन सिंह मुलाच्या उमेदवारीसाठी ताकद लावू शकतात़ ऐनवेळी रमन सिंह हे दुर्गतून न लढता राजनांदगावमधूनही लढू शकतात़ तसे न झाल्यास मधुसुदन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे़ भाजपमधून काँगे्रसमध्ये गेलेल्या करुणा शुक्ला या काँगे्रसकडून लोकसभेच्या उमेदवार असतील, अशी चर्चा आहे़ मात्र, विधानसभा निवडणुकीत राजनांदगावमधून रमन सिंह यांनी शुक्ला यांचा पराभव केला आहे़ त्यामुळे शुक्ला यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला कट्टर काँंगे्रसी विरोधाच्या पावित्र्यात आहेत़ तसे झाल्यास मोहम्मद अकबर यांना उमेदवारी दिली जाईल, असेही सांगितले जात आहे़बिलासपूर लोकसभा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे़ येथून भाजपचे लखनलाल साहू हे विद्यमान खासदार आहेत़ बिलासपूर लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत़ त्यापैकी बिलापूर, तखतपूर या दोन मतदारसंघात काँगे्रसचे आमदार तर बिल्हा, बेलतेरा, मुंगेली (एससी), मस्तुरी (एससी) या चार ठिकाणी भाजप आमदार आणि लोरमी, कोटा या दोन जागेवर जनता काँगे्रसचे आमदार आहेत़ भाजपचे विरोधी पक्षनेते धरमलाल कौशिक हे विद्यमान खासदार साहू यांनाच पुन्हा लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्यासाठी आग्रही आहेत़ त्याशिवाय भाजपकडून अमर अग्रवाल यांचे नावही चर्चेत आहे़ मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे निकटवर्तीय अटल श्रीवास्तव यांचे नाव आघाडीवर आहे़ त्याशिवाय माजी महापौर वाणीराव यांचे नावही चर्चेत आहे़ बिलासपूर लोकसभा मतदारसंघात दोन आमदार असलेल्या जोगी काँगे्रसने आमदार धर्मजीत सिंह यांना लोकसभेच्या मैदानात उतरविण्याची तयारी सुरु केली आहे़ २००९ साली लोकसभा निवडणुकीत पराभव पदरी आलेल्या आमदार रेणु जोगी यादेखील जोगी काँगे्रसच्या ऐनवेळी उमेदवार होऊ शकतात, अशी चर्चा आहे़कोरबा लोकसभा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे़ सध्या येथून बन्सीलाल महतो खासदार आहेत़ कोरबा लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत़ त्यापैकी वैकुंठपूर, भरतपूर-सोनहत (एसटी), कोरबा, मनेंद्रगड, पाली-तानाखार (एसटी), कटघोरा या मतदारसंघात काँगे्रस, मरवाही (एसटी) मतदारसंघात जनता काँगे्रस, रामपूर (एसटी) मतदारसंघात भाजप आमदार आहेत़ या मतदारसंघात त्रिकोणी संघर्ष पहायला मिळेल, असे सांगितले जात आहे़ काँगे्रसचे ज्येष्ठ नेते डॉ़ चरणदास महंत यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ चरणदास महंत यांच्या पत्नी ज्योत्सना या लोकसभा लढवतील, अशी चर्चा आहे़