छत्तीसगडमधील बेमेटारा येथील दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या भीषण अपघातानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
या स्फोटात डझनभर लोक जखमी झाले आहेत. या जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. बेमेटारा जिल्ह्यातील बेरला ब्लॉक अंतर्गत बोरसी गावात असलेल्या दारुगोळा कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज आजुबाजुच्या अनेक गावांपर्यंत ऐकायला आला होता.
या घटनेची माहिती मिळातच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. या स्फोटाच्या तीन तासानंतरही रेस्क्यू टीम घटनास्थळी आलेली नाही. जखमींपैकी सात जणांना रायपूरच्या मेकाहारा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. पैकी एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच इतर जखमींना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. अद्याप मृतांचा आकडा समजला नसून या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे कलेक्टरनी सांगितले. या कंपनीत १५ ते २० लोक काम करतात. काही कर्मचारी स्फोटानंतर बाहेर पळाले होते. यामुळे काहीजण या स्फोटातून वाचले आहेत.