रायपूर - छत्तीसगड सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. रस्त्याबाबत भाष्य करताना मंत्री कवासी लखमा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. धमतरी जिल्ह्यातील कुरूदमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लखमा यांनी रस्त्याची तुलना ही अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केली आहे. आपल्या मतदार संघात हेमा मालिनींच्या गालासारखे सुंदर रस्ते असल्याचं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धमतरी जिल्ह्यातील कुरूदमध्ये मंगळवारी (12 नोव्हेंबर) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी कवासी लखमा उपस्थित होते. लखमा यांनी या कार्यक्रमात आपल्या कोंटा या मतदार संघातील रस्त्याची तुलना ही हेमा मालिनींच्या गालासोबत केली आहे. निवडून आल्यानंतर त्यांच्या गालासारखे सुंदर रस्ते केल्याचं म्हटलं आहे. तसेच हे सांगताना कुरूदमधील खराब रस्त्यांवरून रमन सिंह सरकारवर निशाणा साधला आहे.
'मी मंत्री होऊन काहीच महिने झाले आहेत. मी नक्षल प्रभावित क्षेत्रातून आलो आहे. मात्र तिथे मी हेमा मालिनी यांच्या गालासारखे सुंदर रस्ते केले आहेत' असं कवासी लखमा यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी मतदारांना धमकी देऊन भीती दाखवल्याबद्दल लखमा यांना आयोगाने नोटीस बजावली होती. कवासी लखमा हे छत्तीसगड सरकारमध्ये मंत्री आहेत. लखमा यांनी मतदारांना भीती दाखवताना, जर काँग्रेसशिवाय इतर कोणतेही बटन दाबले, तर तुम्हाला इलेक्ट्रीक शॉक बसेल, असं म्हटलं होतं. त्यामुळे काँग्रेस उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहन लखमा यांनी केलं होतं.
रस्त्यावरील खड्ड्यांबाबत भाष्य करताना काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारमधील जनसंपर्क मंत्री पी सी शर्मा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं शर्मा यांनी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांची तुलना ही भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या गालासोबत केली. तसेच 15-20 दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे चकाचक रस्ते होतील असं देखील म्हटलं होतं. खराब रस्त्यांची पाहणी करण्यासाठी गेलेले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.
जनसंपर्क मंत्री पी सी शर्मा हे मंगळवारी (15 ऑक्टोबर) मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील खराब रस्त्यांची स्थिती पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पीडब्लूडी मंत्री सज्जन सिंह वर्मा देखील उपस्थित होते. कैलाश विजयवर्गीय यांच्या गालासोबत रस्त्याची तुलना केली. तसेच शर्मा यांनी खराब रस्त्यांवरून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना नाव न घेता टोला लगावला होता. 'वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कसारखे रस्ते येथे तयार केले होते त्याचं काय झालं? पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. कैलाश विजयवर्गीय यांच्या गालासारखे हे खड्डे झाले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या आदेशानंतर 15 दिवसांत रस्ते नीट केले जातील. तसेच 15 ते 20 दिवसांत हेमा मालिनी यांच्या गालासारखे चकाचक रस्ते होतील' असं पी सी शर्मा यांनी म्हटलं होतं.