Naxalites Killed in Chhattisgarh : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच देशातून नक्षलवादाला संपवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता आज छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांकडून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. सध्या परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवादी लपल्याची गुप्त माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान, माहिती नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्या गोळीबाराला जवानांनी गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. या कारवाईत 3 महिला नक्षलवादी ठार झाल्या. सुदैवाने जवानांना कोणतीही हानी झाली नाही.
काय म्हणाले होते अमित शाह?केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी(दि.24) बोलताना म्हटले होते की, नक्षलवादी हिंसाचार हे लोकशाहीसमोरील एक मोठे आव्हान असून गेल्या 40 वर्षांत माओवाद्यांच्या हिंसाचारात 17,000 सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांनी प्राण गमावले आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर नक्षलवादाकडे एक आव्हान म्हणून बघितले गेले. आम्ही दोन उद्देशाने काम केले, एक म्हणजे नक्षलग्रस्त भागात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आणि दुसरे म्हणजे लोकांचा विश्वास जिंकून विकासाला चालना देण्यासाठी. याचबरोबर 2014 ते 2024 या काळात नक्षलवादी घटनांमध्ये 53 टक्के घट झाल्याचेही शाह यांनी यावेळी सांगितले.
भारत मार्च 2026 पर्यंत डाव्यांच्या कट्टरवादापासून मुक्त होईल. या धोक्याविरुद्ध अखेरची लढाई सुरू करण्यासाठी मजबूत रणनीती आवश्यक आहे. 2019 पासून आतापर्यंत नक्षलग्रस्त भागांत 277 सीआरपीएफ कॅम्प स्थापन करण्यात आले आहेत आणि सुरक्षेची कमतरता दूर करण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. सुरक्षादलासोबतच NIA आणि ED सारख्या केंद्रीय संस्थांनीदेखील माओवाद्यांचे आर्थिक तंत्र संपवण्याचे कामही केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.