रायपूर - देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर असतानाचा नक्षलवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला आहे. छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित दांतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदार भीमा मंडवी यांच्या ताफ्याला लक्ष्य करून हल्ला घडवून आणला. नक्षलवाद्यांनी ताफ्याला लक्ष्य करून आयईडीद्वारे घडवलेल्या स्फोटात भाजपा आमदार भीमा मंडवी यांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जवानांना वीरमरण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भाजपा आमदार भीमा मंडवी हे सभा आटोपून येत असताना त्यांच्या ताफ्याला लक्ष्य करून नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मंडवी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला नक्षलविरोधी ऑपरेशनचे डीआयजी पी. सुंदर राज यांनी दुजोरा दिला आहे. आज संध्याकाळी नक्षलवाद्यांनी एक शक्तिशाली आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात भाजपा आमदार भीमा मांडवी, त्यांचा वाहनचालक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे, असे पी. सुंदर राज यांनी सांगितले.
या स्फोटात आमदार मंडवी यांच्या ताफ्यात असलेल्या सुरक्षा दलाच्या वाहनाची हानी होऊन छत्तीसगड पोलीस दलाचे पाच जवान गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, या जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलप्रभावीत दांतेवाडा विभागात 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता.
दरम्यान, नक्षलवाद्यांनी आज केलेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील कांकेर येथे सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक उडाली होती. या चकमकीत बीएसएफच्या चार जवानांना वीरमरण आले होते. तर अन्य दोन जवान जखमी झाले होते. कांकेरमधील प्रतापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महला गाव येथे बीएसएफच्या 114 व्या बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक उडाली होती.