छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णाच्या ऑपरेशन दरम्यान डॉक्टरला हार्ट अटॅक आला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. डॉक्टर गर्भवती महिलेवर उपचार करत असतानाच ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रिपोर्टनुसार, डॉक्टर शोभाराम बंजारे हे जिल्हा रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये गर्भवती महिलेवर उपचार करत होते. त्याचवेळी डॉक्टरला हार्ट अटॅक आला आणि डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालय व्यवस्थापनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना आणि डॉक्टरच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
या घटनेला दुजोरा देताना जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ.अनिल जगत यांनी सांगितले की, दुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असलेले डॉ. शोभाराम बंजारे हे सेवानिवृत्तीनंतर गेल्या साडेतीन वर्षांपासून जिल्हा रूग्णालय जंजगीर येथे कंत्राटी पद्धतीने कार्यरत होते.
रात्री 8 वाजता ते ऑपरेशन थिएटरमध्ये गर्भवती महिलेवर उपचार करत असताना अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.