रायपूर : छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात असलेल्या एका गावातील पंचायतीत अजब प्रकार घडला आहे. गावातील पंचायतीने तीन मुलींवर बलात्कार करणा-या तीन आरोपींना प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे तीस हजार रुपयांचा दंड ठोठावून या रकमेतून संपूर्ण गावाला मटणाची पार्टी देण्याची अजब शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, पंचायतीने सुनावलेल्या या निर्णयावर पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने माहितीनुसार, 5 जुलैला संध्याकाळी या तीन मुलींचे कुटुंबीय वाट पाहत होते. मात्र त्या वेळेवर घरी आल्या नाहीत म्हणून गावातील एका तरुणाने त्यांचा शोध घेतला. त्यावेळी तिघींवर आरोपी बलात्कार करताना सापडले. तसेच, या तरुणाने विरोध करताच आरोपी तिथून पळून गेले. त्यानंतर हे प्रकरण गावच्या पंचायतीसमोर ठेवण्यात आले. यावेळी बलात्कार करणा-या आरोपींचे गुन्हे निश्चित करत पंचायतीने त्यांना प्रत्येकी दहा हजार याप्रमाणे 30 हजार रुपयांचा दंड ठोठवला. तसेच, दंडातील रकमेपैकी 485 रुपये गावातील प्रत्येक कुटुंबाला देण्यास सांगितले आणि बाकीच्या पैशातून गावातील 45 कुटुंबांना मटणाची पार्टी देण्याची शिक्षा दिली.
दरम्यान, पंचायतीने दिलेल्या या निर्णयावर पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त करत त्यांनी पोलिसांत धाव घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना पोलिसांकडे जाऊ नका अशी सक्त ताकीद पंचायतीने दिली होती. त्यानंतर पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी येथील स्थानिक पत्रकारांकडे घडलेला प्रकार सांगितला. पत्रकारांनी याबाबत माहिती पोलिसांत दिली असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
जशपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक उनेजा खातून अन्सारी यांनी सांगितले की, याप्रकरणी कोणीही तक्रार दाखल केली नाही. पत्रकारांकडून या घटनेची माहिती मिळाली आहे. पोलिसांचे एक पथक त्या गावात पाठविण्यात आले असून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.