देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण देवळात जातो. साधू संत देवाच्या दर्शनासाठी वर्षानुवर्षे तपश्चर्या करतात, मात्र छत्तीसगढमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यानं चक्क परमेश्वराला आपल्या समोर हजर राहण्याची नोटीस जारी केली आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशातील रायगढ जिल्ह्यातील आहे. येथील नायब तहसीलदारानं चक्क देवाला नोटीस पाठवून समन्स बजावले आहेत, तेही सक्त ताकीद देऊन.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगढ शहरातील प्रभाग 25 मध्ये शिवमंदिर आहे. सुधा राजवाडे नावाच्या महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये शिवमंदिरासह 10 जणांवर सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तहसील कार्यालयाला त्याची चौकशी करावी लागली. तहसील कार्यालयाने सर्व 10 जणांना नोटीस दिली आहे. या सर्व लोकांमध्ये शिवमंदिराचेही नाव आहे. नोटीसमध्ये व्यवस्थापक किंवा पुजारी असंही नमूद करण्यात आलेलं नाही. चक्क मंदिराच्याच नावानं नोटीस जारी करण्यात आली आहे.
यासंदर्भात नोटीस बजावणारे तहसीलदार गगन शर्मा आणि नायब तहसीलदार विक्रांतसिंह ठाकूर यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. हे प्रकरण सरकारी जमिनीच्या बेकायदेशीर ताब्याचे असल्याने आणि 16 जणांनी जागा ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले होते, मात्र 10 नावे जागेवर आली आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यात एक मंदिर देखील आहे, जे ताब्यात घेतलेल्या जमिनीवर बांधले आहे. नोटीस बजावून सर्वांना दहा दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
कोहकुंडा परिसरातील लोकांचा सरकारी जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप आहे, मात्र थेट भगवान शंकराला नोटीस दिल्यानंतर देव स्वत: तहसीलदार न्यायालयात हजर होणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंवा हजेरी न दाखवल्याबद्दल 10,000 रुपये दंड आता देवाच्या नावानं जारी करणार का? या नोटिशीनंतर कोण कोर्टात पोहोचते हे पाहणं बाकी राहिलं आहे.