रायपूर - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत बीएसएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान जखमी झाला आहे. कांकेर जिल्ह्यामध्ये प्रतापपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात ही चकमक उडाली होती. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. रविवारी (15 जुलै) पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गस्तीवर असलेल्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. यावेळी चकमकीदरम्यान दोन जवानांना वीरमरण आले. शहीद जवान बीएसएफच्या 175 व्या बटालियनचे जवान आहेत. हेड कॉन्स्टेबल मुख्तियार सिंग आणि कॉन्स्टेबल लोकेंद्र अशी शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत. शहीद जवानांचे पार्थिव पंखाजूर येतील बीएसएफच्या मुख्यालयात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांनी नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
छत्तीसगड : नक्षलवादी हल्ल्यात बीएसएफचे 2 जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 12:30 PM