रायपूर - छत्तीसगडच्या तरुणी एकदम ‘टनाटन’ होऊ लागल्या आहेत...हे वक्तव्य दुसरं तिसरं कोणी नाही तर भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने केलं आहे. छत्तीसगडमधील कोरबा लोकसभा मतदारसंघातील खासदार बन्सीलाल महतो यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोमवारी एका कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात बोलताना बन्सीलाल महतो यांनी छत्तीसगडच्या तरुणी एकदम ‘टनाटन’ होऊ लागल्या आहेत असं वक्तव्य केलं. बन्सीलाल महतो यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेत सार्वजनिकपणे माफी मागावी अशी मागणी केली आहे.
गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बन्सीलाल महतो यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना 77 वर्षीय बन्सीलाल महतो बोलले आहेत की, 'राज्य क्रिडामंत्री भैय्यालाल रजवाडे मला नेहमी सांगत असतात की, आता मुंबई आणि कोलकातामधील तरुणींची गरज राहिलेली नाही. कोरबा आणि छत्तीसगडमधील तरुणी एकदम टनाटन होऊ लागल्या आहेत'.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भैय्यालाल रजवाडे यांना जेव्हा पत्रकारांनी तुम्ही असं कधी बोलला होतात का विचारलं असता, त्यांनी यामधून पुर्णपणे अंग काढून घेतलं.
भैय्यालाल रजवाडे यांनी सांगितलं की, 'खासदार साहेबांनी माझं एक वाक्य उचललं आणि वेगळा संदर्भ लावत सर्वांसमोर मांडलं'. भैय्यालाल रजवाडे यांच्या प्रवक्त्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, 'मंत्रीसाहेब एकदा बोलले होते की मुंबई आणि दिल्लीच्या कलाकारांना आणण्याची काही गरज नाही. कारण छत्तीसगडमधील तरुणींमध्येही तितकीच प्रतिभा आहे'. प्रवक्त्याने सांगितल्यानुसार, बन्सीलाल महतो यांच्या वक्तव्याशी भैय्यालाल रजवाडे यांचा काहीही संबंध नाही.
बन्सीलाल महतो यांच्या वक्तव्यानंतर, विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं असून त्यांनी टिकेला सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री अजीत जोगी यांचा मुलगा अजित जोगीदेखील कार्यक्रमाला उपस्थित होता. बन्सीलाल महतो यांचं वक्तव्य दुर्देवी असल्याचं ते बोलले आहेत. 'एका खासदाराला असं वक्तव्य करणं शोभत नाही. यावरुन भाजपाला महिलांप्रती असलेला दृष्टीकोन समोर येतो', असं अजित जोगी बोलले आहेत.